स्वामी समर्थ महाराजांची शिकवण : खरी भक्ती म्हणजे नेमके काय? वाचा
By देवेश फडके | Published: February 4, 2021 03:46 PM2021-02-04T15:46:06+5:302021-02-04T15:47:15+5:30
एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याची शिकवण स्वामींनी दिली.
स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांडनायक असे संबोधले जाते. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते. या कालावधीत स्वामींनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली. दुष्टांना सुष्ट बनविले. जगात सद्धर्म, सुसंस्कृती अन् भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या, असे म्हटले जाते. एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याची शिकवण स्वामींनी दिली.
स्वामी विश्राम करत असताना, बाळप्पा त्यांची सेवा करत होते. तेवढ्यात स्वामींनी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी केली. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारला. बाळप्पांनी प्रांजळपणे स्वामींनाच त्याचे उत्तर द्यायला विनविले. स्वामी म्हणाले की, भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून, ईश्वराचे असे मानून, तन, मन आणि धन आदींनी केलेले समर्पण म्हणजे भक्ती.
ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!
एक गोसावी एका गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या पोटात सदैव कळा यायच्या. पण द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन घ्यावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. मृत्युपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे, असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी, संन्यासी रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. काहीसा विचार करून गोसावी अक्कलकोटला येतो.
अक्कलकोटला आल्यावर गोसावी स्वामी दर्शनासाठी येतो. क्यो द्वारका जा रहे थे ना? यहा अक्कलकोट कैसे पहुचे? स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी आश्चर्यचकीत होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की, हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. मात्र, ती वेळ अजून आली नसल्याचे स्वामी त्याला सांगतात. अनन्य भाव-भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरू पूर्ण करतोच, असे स्वामी म्हणतात.