प्रार्थना कशी करावी, सांगत आहे स्वामी समर्थ महाराज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:00 AM2021-03-11T08:00:00+5:302021-03-11T08:00:02+5:30
प्रार्थना अशी करा, की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी. तर ती खरी प्रार्थना!
प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही. का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात...
एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळे जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असेच चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले,
'अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा. प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली, तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एकदिलाने प्रार्थना करा.'
सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य...पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला!
तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली, तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा, की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी. तर ती खरी प्रार्थना!