स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:16 AM2024-05-06T11:16:15+5:302024-05-06T11:16:40+5:30

Swami Samarth Punyatithi 2024: स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अवश्य म्हणा स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या...

swami samarth punyatithi 2024 chant these aarti of swami samarth maharaj swami samarth aarti in marathi | स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती

स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती

Swami Samarth Punyatithi 2024: 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे कोट्यवधि भाविकांचे श्रद्धास्थान. संकटकाळात, समस्या असताना, अडचणीत स्वामींना केवळ हाक मारावी आणि स्वामींनी माऊलीप्रमाणे मदतीला धावून यावे, असा लाखो भाविकांचा अनुभव आहे. आनंदाच्या, सुखाच्या क्षणातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी श्रद्धा हजारो स्वामीभक्तांची आहे.

केवळ स्वामी समर्थांचे नाव घेतले तरी एक विश्वास मिळतो. चैतन्य येते, असे अनेक स्वामीभक्त सांगतात. लाखो घरांमध्ये दररोज स्वामी समर्थ महाराजांचे पूजन, भजन, नामस्मरण केले जाते. स्वामी समर्थ प्रकट दिन आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच अवतारकार्य समाप्ती दिन हे दोन्ही दिवस स्वामी भक्त विशेषत्वाने साजरे करतात. या दिवशी स्वामींची विशेष पूजा केली जाते. स्वामी नामाचा अखंड नामजप केला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये देवस्तुती करण्यासाठी विविध प्रकारची स्तोत्रे, श्लोक रचले गेले आहेत. काही अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. ते श्लोक वा ती स्तोत्रे म्हटल्याचा लाभ होतो, असे सांगितले जाते. पूजनानंतर सर्वजण एकत्रित येऊन आरती करतात. स्वामी पूजनानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती अवश्य म्हणावी, असे सांगितले जाते. या तीनपैकी कोणतीही एक किंवा सर्व आरत्या म्हटल्यास उत्तम.

श्री स्वामी समर्थ आरती

|| जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थां
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || 
जयदेव जयदेव ||ध्रु||

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी|
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी|
भक्त वत्सल खरा तू एक होसी|
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||१||

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार|
याची काय वर्णू लीला पामर |
शेषादीक शिणले नलगे त्या पार |
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||२||

देवाधिदेव तू स्वामीराया|
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया |
तुजसी अर्पण केली आपली ही काया|
शरणागता तारी तू स्वामीराया ||३||

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले|
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे|
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले|
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||४||

श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती (आरती - २)

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे ॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे ॥१॥

यवन पूछिले स्वामी कहाॅ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे ॥२॥

जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे ॥३॥

स्वामी समर्थ महाराज आरती (आरती - ३)

आरती स्वामी राजा।(२)
कोटी आदित्यतेजा। तु गुरु मायबाप।
प्रभू अजानुभुजा। आरती स्वामी राजा॥धृ॥

पूर्ण ब्रम्ह नारायण।(२)
देव स्वामी समर्थ। कलीयुगी अक्कलकोटी।
आले वैकुंठ नायक। आरती स्वामी राजा ॥१॥

लीलया उद्धरिले।(२)
भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी।
केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा ॥२॥

अखंड प्रेम राहो।(२)
नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती।
म्हणे आम्हा सांभाळा। आरती स्वामी राजा ॥३॥

श्री स्वामी समर्थ महाराज आरती (आरती - ४)

जय देव जय देव, जय जय अवधूता, हो स्वामी अवधूता।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।।
जय देव जय देव ॥धृ॥

तुमचे दर्शन होता जाती ही पापे।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।
वैकुंठीचे सुख नाही या परते।।
जय देव जय देव ॥१॥

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।
शरणागत तुज होतां भय पडले काळा।
तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव ॥२॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।
अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव ॥३॥

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।
अनंत रुपे धरसी करणे नाएक।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।।
जय देव जय देव ॥४॥

घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।।
जय देव जय देव ॥५॥

॥ अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय॥

॥श्री स्वामी समर्थ॥

 

Web Title: swami samarth punyatithi 2024 chant these aarti of swami samarth maharaj swami samarth aarti in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.