स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:37 AM2024-05-06T10:37:50+5:302024-05-06T10:38:26+5:30

Swami Samarth Punyatithi 2024: आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. जाणून घ्या, स्वामीकार्याविषयी...

swami samarth punyatithi 2024 know about swami Samarth maharaj avatar karya on remembrance day | स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!

स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!

Swami Samarth Punyatithi 2024: चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. १० मे २०२४ रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आहे. या दिवशी विशेषत्वाने स्वामींचे स्मरण केले जाते. काही मान्यतांनुसार, ३० एप्रिल १८७८ रोजी स्वामींनी अवतारकार्याची सांगता केली. श्री स्वामी समर्थ यांचे परम शिष्य चोळप्पा, यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात, की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले, तरीदेखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत, असे म्हटले जाते. 

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. मी नृसिंहभान असून, श्रीशैलम‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींचे उद्‌गार, ते नृसिंहसरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा, जेव्हा ते अक्कलकोटनगरीत आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. कर्दळी वनात प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली. स्वामींनी भ्रमणकाळात अनेकांना दृष्टांत दिल्याचे सांगितले जाते. 

स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले.तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष, दर्शनासाठी म्हणून आपल्या तिघा शिष्यांसाह आले होते. ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी, एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली. त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले. 

स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी, त्यांना आपण कोण आहात व कोठून आलात, असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, 'माझा संचार सर्व विश्वात आहे. पण, सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशिक्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर,औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर, ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत.'' हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणी बुवांनी तर, महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत, असा निष्कर्ष काढला. 

स्वामींनी लोकांना भक्तीमार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठस्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. असे म्हणतात, की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे,  श्री स्वामी समर्थ महाराज!, असे म्हटले जाते. 

|| श्री स्वामी समर्थ||
 

Web Title: swami samarth punyatithi 2024 know about swami Samarth maharaj avatar karya on remembrance day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.