Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका; वाचा, रंजक कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:09 PM2021-06-16T15:09:57+5:302021-06-16T15:10:48+5:30
स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात.
विश्वास. बहुतांश वेळेस माणून समोरची व्यक्ती काय सांगते, ते ऐकतो, त्याप्रमाणे कृती करतो. कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र, काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, याची शिकवण दिली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. नेमके काय घडले जाणून घेऊया...
श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!
स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की, जसा राजा तसी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही, कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. एवढेच नव्हे, तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने किरकोळ, क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते.
मूर्तीपूजा का केली जाते? ‘असे’ पटवून दिले स्वामी विवेकानंदांनी महत्त्व
दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार, असे स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की, प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष्य आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे, असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थानाच्या जप्तीबाबत राजाला खलित येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो.
स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!
स्वामी राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कानउघडणी करतात आणि म्हणतात की, चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली? त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की, तुला क्षमा नाही. तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश की, इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा, आपण गुरुपदेश मानला नाही. शेवटी आपल्या मनाचं केले. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी शिकवण स्वामी देतात.