Swami Samartha: तुम्ही कधी स्वामींवर रागावलात का? 'अशी' मागा माफी, ते नक्कीच जवळ घेतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:33 IST2025-04-24T16:32:29+5:302025-04-24T16:33:02+5:30

Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथीआहे, त्यानिमित्त जाणतेअजाणतेपणी झालेल्या चुकांची माफी मागूया आणि अपराधी भावनेतून मुक्त होऊया!

Swami Samartha: Have you ever been angry with Swami? Apologize like this, he will definitely take it! | Swami Samartha: तुम्ही कधी स्वामींवर रागावलात का? 'अशी' मागा माफी, ते नक्कीच जवळ घेतील!

Swami Samartha: तुम्ही कधी स्वामींवर रागावलात का? 'अशी' मागा माफी, ते नक्कीच जवळ घेतील!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

शनिवार २६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी(Swami Samartha Punyatithi 2025) . स्वामी प्रगट दिनापासून स्वामी पुण्यतिथीपर्यंत अनेक भक्त वेगवेगळे संकल्प करून आपल्या लाडक्या महाराजांच्या सेवेत रुजू होतात. महाराजसुद्धा आपल्या लाडक्या भक्तांसाठी धावत येतात आणि त्यांना दर्शन देतात. एक सच्चा भक्त त्यांच्या एका कटाक्षाचा भुकेला असतो. पारमार्थिक सुख अनुभवणे ह्याला खरच पूर्व पुण्याई लागते असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

पारमार्थिक जीवन जगणे सोपे नाही, क्षणाक्षणाला खाचखळगे आहेत, पाय रक्तबंबाळ होतात आणि परतीचा मार्गही नसतो. पण खऱ्या भक्तांची तळमळ सुद्धा तितकीच असते. काहीही झाले तरी ह्या पथावरून ते चालतच राहतात. 

स्वामी समर्थांनी भक्तांना अभिवचन दिले आहे की जो अनन्य भावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालविन. म्हणूनच कुठलीही शंका न घेता त्यांची सेवा करत राहणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे.  

Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!

आज कलियुगात स्पर्धा आहे, कष्ट आहेत, पण तरीही एक क्षणभर आत्यंतिक ओढीने, खऱ्या तळमळीने जर महाराजांच्या पुढे उभे राहिले तर त्या एका क्षणातच आपल्या आयुष्याचे  सोने महाराज करतील ह्यात शंका नसावी. देव खऱ्या भक्तीचा भुकेला आहे. प्रापंचिक गोष्टीना कवटाळून भक्ती अशक्य आहे. एकदा माझे काहीतरी बिनसले आणि मला महाराजांचा इतका राग आला की मी मनात म्हटले, 'उद्याच जाते आणि घरातील फोटो , पोथीचे विसर्जन करून टाकते.'  त्याच निश्चयाने झोपले आणि सकाळी उठले तेव्हा मनात विचार आला की ह्या सर्वाचे विसर्जन केले तर मग आयुष्यात काहीच उरणार नाही. गोळाबेरीज शून्य. महाराजांची सेवा करताना ह्या गुरु तत्वात दुधात साखर मिसळावी असे आपण त्यात कधी विरघळून जातो ते आपल्यालाही समजत नाही. 

कालांतराने आपली वेगळी अशी इच्छाच उरत नाही . एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले की ते करतील ते आणि ते नेतील तिथे ...ते जे काही करतील ते आपल्या भल्याचेच असेल ह्यावर नितांत श्रद्धा , विश्वास असला पाहिजे. आपण काहीही मागितले तरी आपल्याला जे पेलवेल, रुचेल तेच ते देतील आणि करतीलही ह्यावरून आपली श्रद्धा तसूभर सुद्धा हलली नाही पाहिजे. 

अध्यात्म आपले आयुष्य घडवते. चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते .घेण्यापेक्षा देण्यात किती आनंद आहे त्याचा अनुभव देते . थोडक्यात मनुष्याने मनुष्याशी मनुष्या सारखे वागावे हाच संदेश आपल्याला  अध्यात्म देत असते. आपल्या जीवनाचा अर्थ काय ? आपल्या जन्माचे रहस्य काय ? ह्याचे चिंतन करायला शिकवते . आपली कर्तव्ये आणि त्याचे पालन करायला आपली हि माऊली आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवते. 

रोज आपण एकेक पाऊल मरणाच्या दिशेने जात आहोत. त्यामुळे जो काही वेळ आहे तो समर्थांच्या सेवेत अर्पण करत जीवन जगत राहणे हे प्रत्येक भक्ताचे परम कर्तव्य आहे. पारमार्थिक सेवा कधीही फुकट जात नाही. इथे सहज सोप्पे काहीच नाही पण अशक्य असेही नाही. शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे . मनाच्या खोल गाभाऱ्यातून आपल्या ह्या लाडक्या गुरूना हाक मारली तर ते क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला मायेने जवळ घेतील हा अनुभव स्वामिभक्ताना नवीन नाहीच!

स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा उच्च कोटीची प्रचीती देणारा आहे. तारक मंत्रातील प्रत्येक शब्द संजीवन आहे . त्याची अनुभूती तो म्हणतानाच येते. तारक मंत्र म्हणून होईपर्यंत महाराज आपल्या समोर उभे नाही राहिले तरच नवल. प्रचंड दैवी शक्ती आणि पदोपदी अनुभवांची प्रचीती देणारे असे हे माझे स्वामी त्यांच्याबद्दल किती लिहू आणि किती नको असे होऊन जाते. त्यांच्याशिवाय माझे जीवन केवळ अशक्य आहे. उठता बसता त्यांनी प्रचीती दिली आहे. गुरु माझे स्वामी गुरु माझे स्वामी . 

ज्योतिष शास्त्र जाणणाऱ्या वाचकांना माहितच आहे कि गुरु महाराज आपल्या स्वगृही आले आहेत. पुढील वर्ष आपणही त्यांच्याच सारखे आपल्या स्वगृही राहून साधना  उपासना , नामस्मरण , ग्रंथवाचन , मनन चिंतन , ध्यानधारणा करून त्यांच्या सेवेत रममाण होऊया. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. पंचप्राण एकत्र करून मनाच्या गाभाऱ्यातून आपल्या सद्गुरूंच्या नावाचा जयजयकार करुया, ह्या परमतत्वात विलीन होऊया आणि आयुष्याचे सोने करुया.

घराचा उंबरठा हे सुद्धा अध्यात्माचे प्रतीकच आहे. उंबरठ्याच्या बाहेर जग सुरु होते आणि तिथे आपले कुणी नसते. म्हणूनच इथेतिथे भटकणारे आपले मन घरात, घरातील माणसांमध्ये गुंतले तर प्रपंच सुद्धा बहरेल ,काय वाटते? आपल्या स्वामींचे मंदिर आपल्या हृदयात बांधूया, त्यांना आपल्या मनातील राज सिंहासनावर विराजमान करुया. त्यासाठी आपल्या मनातील असूया , मत्सर  द्वेष चिंता काळजी ह्यांची जळमटे दूर करुया . जिथे राजाधिराज योगीराज विसावतील ते ठिकाण स्वर्गासारखे सुंदर असेल शाश्वत असेल. अशाश्वत गोष्टींचा मोह सोडून शाश्वत जे आहे ते मिळवूया .

Swami Samartha: स्वामींचा 'हा' मंत्र घराच्या भिंतीवर लिहून काढा; कायमस्वरूपी तणावमुक्त व्हाल!

आपला मी पणा कमी झाला की  आपण महाराजांच्या समीप जायला लागतो. हा मार्ग मोक्षाचा आहे . दिल्याशिवाय मिळत नाही . महाराजांच्या चरणाशी एकदा जागा मिळाली की  ती प्राण गेला तरी सोडायची नाही. कारण आपण सोडली तर दुसरा भक्त ती घेईल. महाराजांची सेवा आपल्यात अमुलाग्र बदल घडवते . अशा भक्ताला मग झाडाचे गळणारे पान दिसत नाही तर त्याला फुटलेली नवीन पालवी दिसते. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे अवगुण विसरून त्यातील गुणांचा सन्मान करुया . 

ह्या परमतत्वात विलीन होणाराच महाराजांचा परम भक्त होतो आणि ह्या अध्यात्मिक जीवनाची अनुभूती ,गोडी खऱ्याअर्थाने चाखून मोक्षाच्या प्रवासाला जातो.   
सर्व स्वामी भक्तांना हा लेख समर्पित!

संपर्क : 8104639230

Web Title: Swami Samartha: Have you ever been angry with Swami? Apologize like this, he will definitely take it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.