Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:20 PM2024-10-15T12:20:25+5:302024-10-15T12:24:29+5:30
Swami Samartha: पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल स्वामींची मूर्ती भेट मिळाली, तिची ते स्थापनाही करणार आहेत; आपल्यालाही तशी करायची असेल तर नियमावली वाचा!
स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात. मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी. मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो, त्या मूर्तीची योग्यप्रकारे पूजा होणे आवश्यक असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील १४ ऑक्टोबर रोजी स्वामी भक्तांकडून अशीच एक सुंदर स्वामी समर्थांची मूर्ती भेट म्हणून मिळाली. त्याबद्दल आदरपूर्वक उद्गार काढत मोदींनी ट्विट केले आहे, की ''आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे. त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.''
अशी स्वामी कृपा आपल्याही बाबतीत घडली, किंवा स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी ते जाणून घेऊ.
>> स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्त्व प्राप्त होते.
>> स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी, मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल, अशी निवडावी.
>> स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम, विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी.
>> मुर्तीस्थापनेसाठी चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरु पौर्णिमा, दत्त जयंती असे दिवस निवडावेत. गुरु पुष्यामृत योगावर मुर्तीस्थापना करणेही योग्य ठरते. जवळपास यापैकी कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मुर्तीस्थापना करण्यास काहीच हरकत नाही.
>> स्वामींची मुर्तीस्थापना घरच्या घरी देखील करता येते. परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण करत, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते.
>> गुरुजी मिळत नसल्यास ताम्हनात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत 'श्री स्वामी समर्थ' मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी.
>> ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका.
>> स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करावे.
>> रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी!