Swami Samartha : वारुळावर कुऱ्हाड पडली आणि स्वामी समर्थांची तेजस्वी मूर्ती प्रगटली, वाचा सत्यकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 07:00 AM2024-04-10T07:00:00+5:302024-04-10T07:00:02+5:30
Swami Samartha Story: आज स्वामी समर्थांचा प्रगटदिन आहे; त्यानिमित्त त्यांचे अवतार कार्य कधी, कसे व कुठून सुरू झाले ते जाणून घ्या!
- शंकर हिरतोट, अक्कलकोट प्रतिनिधी
'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. आज १० एप्रिल २०२४ स्वामींचा प्रगटदिन. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले, गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती, हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, असे म्हणतात. "मी नृसिंहभान असून, श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे" , हे स्वामींचे उद्गार, ते नृसिंहसरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात.
श्री स्वामी समर्थ १९ व्या शतकात होऊन गेले. विविध ठिकाणी, स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा, जेव्हा ते अक्कलकोटनगरीत आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.
इ.स. १४५९ मध्ये, स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना, त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रगट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.
आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली, ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी, उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापुर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिले.
अक्कलकोट निवासातील प्रसंग :-
इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. एका विलासी चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले. हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले.तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष, दर्शनासाठी म्हणून आपल्या तिघा शिष्यांसाह आले होते. ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी, एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली. त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले.
स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी, त्यांना आपण कोण आहात व कोठून आलात, असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, 'माझा संचार सर्व विश्वात आहे. पण, सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशिक्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर,औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर, ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत.'' हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणी बुवांनी तर, महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत, असा निष्कर्ष काढला. स्वामी समर्थ तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले. आळवणी बुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला. पुढे आळवणी बुवांना स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती मिळाली.
नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता. तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे. तिथले महंत, भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत. त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी चार गुंडही पोसून ठेवले होते. स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले, तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडविले व पैसे मागितले. स्वामी समर्थांजवळ कोठून पैसे असणार ? ते काहीही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले. ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले. ते त्यांना मारायला धावले. तेवढ्यात स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर आपली बैठक मांडली. ती किमया पाहून गुंड व त्यांना पोसणारा महंत ताळ्यावर आला. ते स्वामी समर्थांना शरण गेले. अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्तीमार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठस्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परम शिष्य चोळप्पा, यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. असे म्हणतात, की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले, तरीदेखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. म्हणूनच तर स्वामींबद्दल म्हणतात,
सबसे बडा गुरू...
गुरूसे बडा गुरू का ध्यास...
और उससे भी बडे, श्री स्वामी समर्थ महाराज!