स्वामी समर्थांचा 'तारक मंत्र' हा तर आजच्या कठीण काळातला मानसिक दिलासा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 14, 2021 04:56 PM2021-04-14T16:56:05+5:302021-04-14T16:57:08+5:30

तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल.

Swami Samarth's 'Tarak Mantra' is a mental relief in today's difficult times! | स्वामी समर्थांचा 'तारक मंत्र' हा तर आजच्या कठीण काळातला मानसिक दिलासा!

स्वामी समर्थांचा 'तारक मंत्र' हा तर आजच्या कठीण काळातला मानसिक दिलासा!

googlenewsNext

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात इ.स. १८५६ मध्ये ते प्रगट झाले, तो आजचाच दिवस. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला.' खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आजही तारक मंत्राच्या रूपाने स्वामींचे प्रासादिक शब्द भक्तांना जगण्याची उर्मी देत आहेत. 

ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला 'तारक मंत्र' तणाव नियंत्रणाचे धडे देतो.  तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. यासाठी तारक मंत्राची आशयासह उजळणी करू. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी

कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही. सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भयी असले पाहिजे. भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची? कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचे हे स्वामी बघून घेतील. 

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला

स्वामी कथेतला एक प्रसंग. यमराज एका व्यक्तीला न्यायला आले. ती व्यक्ती स्वामीभक्त होती. तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रगट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावले. एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपला काळ कधी यायचा, हे स्वामी ठरवतील. आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल. 

उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.

कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही. म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्म मृत्यू खेळ आहे. या प्रवासात जेवढे आयुष्य वाट्याला आले, मनसोक्त जगून घ्यायचे. आई बाळाला सांभाळते, तशी आपली काळजी घ्यायला स्वामी 'समर्थ' आहेत. 

खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ

माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही. तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले, तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत, हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायला हवा. ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे. 

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती

स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपले विहितकर्म पूर्ण करा. कारण काम हाच ईश्वर आहे. काम सोडून, जबाबदारी झटकून स्वामीभक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येत तणावमुक्त करतात. 

Web Title: Swami Samarth's 'Tarak Mantra' is a mental relief in today's difficult times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.