Swami Vivekanand: 'माझ्या मृत्यूनंतर अस्थीदेखील चमत्कार करतील' असे स्वामी विवेकानंद का म्हणाले? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 01:58 PM2024-07-04T13:58:41+5:302024-07-04T13:59:01+5:30
Swami Vivekanand: आज स्वामी विवेकानंद यांचा पुण्यस्मरण दिन, ३९ वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय कामगिरी करणारे योद्धा संन्यासी आणि त्यांची दिव्य जीवनी वाचा.
> ह.भ.प.योगेश्वर उपासनी महाराज,
आदित्य संप्रदायी,राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य
आजच्याच दिवशी १९०२ या वर्षी या महामानवाने अलौकिक कार्य करून मानवी जीवनातला शेवटचा श्वास रात्री नऊ वाजेच्या सुमारास घेतला. पूज्य प्रभुपाद आद्य शंकराचार्यांच्या नंतर एवढ्या कमी मानवी जीवनामध्ये इतके अलौकिक धर्मकार्य करणारा हा नरशार्दुल आपल्या भारत वर्षांमध्ये व सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जन्माला आला हे आपले परमभाग्यच होय. अवघ्या ३९ वर्षाच्या अल्पायु मध्ये या महामानवाने सनातन धर्म, मानवता, विश्वबंधुता व सेवाधर्म, या क्षेत्रात जे अलौकिक व अतुलनीय कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात कुठेही तोड नाही.
कलकत्ता येथिल श्री विश्वनाथ बाबू दत्त व भुवनेश्वरी देवी या शुचिष्मंत,संस्कार संपन्न व बुद्धीसागर असलेल्या दांपत्याच्या पोटी या महामानवाने पौष वद्य ७, दिनांक १२ जाने १८६३ रोजी अवतार घेतला. यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या आईला त्यांच्या या अ-मानुष अवतारित्वा बद्दल संकेत मिळाला होता. काशी च्या भगवान वीरेश्वराच्या उपासनेतून भुवनेश्वरी ने भगवान शंकरांना, भगवान शंकरांनीच आपल्या उदरी जन्माला यावे असे वरदान मागून घेतले होते. या दिव्य बालकाचे जन्म नाव "वीरेश्वर" असे ठेवण्यात आले, प्रेमाने भुवनेश्वरी माता यास "विले "म्हणून हाक मारीत असे.परंतु नरेंद्र या नावाने तो अधिक प्रसिद्ध होता.
ऋतंभरा प्रज्ञा लाभलेला हा बालक बालपणापासूनच तेजस्वी, निडर,निर्णय क्षम, धाडसी पण अतिशय अतिशय निर्मळ अंतःकरणाचा व भावसुकोमल होता. बालपणातच त्याच्या अलौकिकतत्त्वाची साक्ष देणाऱ्या अनेक घटना त्याच्या चरित्रात आपणास बघावयास मिळतात. आईकडून सश्रद्ध अंत:करण व वडिलांकडून चिकित्सक धारदार बुद्धिमत्तेचे लेणं नोरेनला मिळालं होतं. सर्व प्रकारच्या सुख संपन्नतेने समृद्ध असलेल्या घरात नरेंद्र चे शैषव व तारुण्य बहरू लागले. बी.ए.च्या शेवटच्या वर्षात असताना वडिलांच्या अचानक मृत्यू आघाताने हा तरुण अंतर्बाह्य करचळला.
सुदैवाने दक्षिणेश्वरी असलेल्या एका अलौकिक अवलियाच्या सानिध्यात तो यापूर्वीच आला होता. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अनेक मूलभूत प्रश्न निर्माण करून त्याने तत्कालिन बंगालातिल अनेक मूर्धन्य विद्वानांना जेरीस आणले होते. दक्षिणेश्वरी असलेल्या अतिशय सरळ, निगर्वी, ऋजु व भगवतीच्या उपासनेमध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेल्या या महापुरुषाचे नाव होते श्री गंगाधर मुखोपाध्याय. जे संपूर्ण विश्वात स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणून पुढे परिचित झाले. याच रामकृष्ण परमहंसांना नरेंद्राने प्रश्न विचारला,आपण देव बघितला आहे काय? आणि तो मला दाखवू शकाल काय ?
......आणि आणि काय आश्चर्य, अगदी प्रथमच आज या या वरकरणी अशिक्षित वाटणाऱ्या अलौकिक महापुरुषाने नरेंद्रला अपेक्षित असलेले उत्तर दिले. म्हणाले होय मी देव बघितला आहे, जेवढ्या स्पष्टपणाने मी तुला पाहतो आहे त्याहीपेक्षा स्पष्टपणाने मी देवाला बघत असतो. या एकाच वाक्याने नरेंद्र चे भावजीवन अंतर्बाह्य बदलून गेले, पुढे तो ठाकूरांच्या सहवासात सातत्याने येऊ लागला व आपल्या आंतरिक तळमळीतून अगम्य,अचिंत्य अशा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग त्याला ठाकुरांच्याच कृपेने गवसला. "शिवभावे जीव सेवा" हा ठाकुरांनी दिलेला महामंत्र नरेंद्र अक्षरशः जगला व त्याने ठाकूराच्या कृपेने विश्वबंधुत्वाचे एक नवे पर्व साकार केले.
अशाच एका रात्री ठाकूर दक्षिणेश्वर च्या आपल्या झोपडीत ध्यानमग्न बसले होते व नरेंद्र नगारखान्याजवळच्या एका खोलीमध्ये अतिशय अस्वस्थ पणाने ईश्वर प्राप्ति साठी व्याकुळ झाला होता. ही व्याकूळता शिगेला पोचल्याने तो साधारणत: मध्यरात्रीच्या सुमारास ठाकुरांच्या झोपडी समोर येऊन उभा राहिला आणि हळूच त्याने बाहेरून ठाकूरांना आवाज दिला. ठाकूरांनी आतुन प्रश्न केला कोण आहे? आणि बाहेरून या शिष्योत्तमाने उत्तर दिले "महाराज,"मी" कोण आहे हे समजून घेण्यासाठीच मी आपल्या दाराशी याचक म्हणून आलो आहे. नरेंद्राच्या जीवनात त्या मध्यरात्री गुरु कृपेची नवी पहाट झाली.रामकृष्णांनी आपले सर्व आध्यत्मिक संचित नोरेनला देऊन एक नवा इतिहासच लिहायला सुरुवात केली. श्रीरामकृष्ण परमहंसांच्या महा समाधीनंतर त्यांच्या सर्व शिष्य परिवाराला नरेंद्रनेच सांभाळले, परिव्राजक अवस्थेमध्ये "विविदिशानंद" या नावाने भारत भ्रमण करणाऱ्या या योध्या संन्यास्यास "विवेकानंद" हे नामाभिधान त्यांच्या शिष्याकडून प्राप्त झाले.
13 सप्टेंबर 1893 या दिवशी शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेमध्ये या शिष्योत्तमाने आपल्या श्रीगुरूंच्या कृपेने जो अध्यात्माचा मंगल दीप प्रज्वलित केला त्याच्या आभेने संपूर्ण पाश्चिमात्य जग झाकोळून गेले, प्रभावित झाले.सलग साडेतीन वर्षे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सनातन धर्माचे मूलभूत सिद्धांत व विशेषत्वाने वेदान्त समजावून सांगितला. तुम्ही आहात तिथून,तुम्ही करित आहात त्याच उपासनेतून, तुम्हाला जमेल त्या भाषेत तुम्ही भगवंताला साद घाला भगवंत तुमच्या उद्धारासाठी निश्चित पणे प्रकट होईल असा विश्वास त्यांनी संपूर्ण अध्यात्मिक भाव जगताला दिला.
भारतात परत आल्यानंतर हा विश्वविजयी महात्मा मद्रासच्या सागर किनार्यावर एखाद्या अबोध बालका सारखा गडबडा लोळला व त्याने आपल्या मातृभूमीला अभिवादन केले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून जगाला प्रॅक्टिकल वेदांत व भारतीयांना सेवाधर्म शिकवण्याचे महत्कार्य या महात्म्याने केले.
"माझ्या मरणाची काळजी करू नका मी मेल्यानंतर माझ्या अस्थि सुद्धा चमत्कार करतील " असे आत्मविश्वास पूर्ण उद्गार त्यांनी काढले." खरोखरच तो चमत्कार आजही युवा पिढीत पाहायला मिळतो, तो विवेकानंदांच्या विचारांतून! ते म्हणत, ''या जन्मात मी नेमके काय कार्य केले आहे हे समजण्या साठी एक नवा विवेकानंद जन्माला यावा लागेल!"
संपूर्ण जगाला शांती आणि सहजीवनाचा संदेश देणारा हा " योद्धा संन्यासी " आपल्या वक्तृत्वाने, कर्तुत्वाने, निष्कलंक व विश्वात्मक चरित्राने संपूर्ण विश्वाचा "विश्वबंधू" म्हणून सुविख्यात झाला. गुरुदेव ठाकुर रामकृष्ण परमहंसांनी सोपविलेली जबाबदारी पूर्ण करून कृतकृत्यतेने जेष्ठ वद्य १४, दिनांक ४ जुलै १९०२ यादिवशी या भारत मातेच्या थोर सुपुत्राने भारत मातेच्या चरणी आपला देह समर्पित केला.
विश्व बंधू स्वामी विवेकानंदांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी श्रद्धापूर्वक भाव सुमनांजली.......
संपर्क : 94 222 84 666 / 7972002870