स्वामी विवेकानंद यांना अनेकदा काली मातेच्या कृपेचा साक्षात्कार झाला; त्यापैकीच एक रोमांचित करणारा प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:43 IST2025-01-20T17:43:33+5:302025-01-20T17:43:50+5:30

२१ जानेवारी रोजी कालाष्टमी आहे आणि तिथीनुसार स्वामी विवेकानंद यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यात घडलेला भगवंत कृपेचा एक प्रसंग जाणून घेऊ.

Swami Vivekananda experienced the grace of Goddess Kali many times; one of them was a thrilling incident! | स्वामी विवेकानंद यांना अनेकदा काली मातेच्या कृपेचा साक्षात्कार झाला; त्यापैकीच एक रोमांचित करणारा प्रसंग!

स्वामी विवेकानंद यांना अनेकदा काली मातेच्या कृपेचा साक्षात्कार झाला; त्यापैकीच एक रोमांचित करणारा प्रसंग!

आपण कोणाला थोडी बहुत मदत करतो आणि स्वत:ला दानशूर समजू लागतो. परंतु, भगवंताशिवाय कोणीही कोणाचा पोशिंदा नसतो. आपण केवळ भगवंताचे दूत असतो. त्याने दिलेले कार्य पूर्ण करणारे माध्यम असतो. परंतु, हे लक्षात न घेता आपण दानाचा वृथा अहंकार बाळगतो. मात्र, भगवंत तो अहंकार फार काळ टिकू न देता आपल्या डोळ्यात अंजन घालतो. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला किस्सा आपल्याला या गोष्टीची निश्चित जाणीव करून देईल.

स्वामीजी एकदा कलकत्त्याला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. संन्यस्त जीवन जगत असलेल्या स्वामीजींकडे प्रवासादरम्यान ना खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या, ना कपडेलत्यांची गाठोडी. एखाद्या फकिराप्रमाणे जीवन व्यतित करणारे स्वामीजी मुखी हरीनाम घेत प्रवास करत होते. 

त्यावेळी एक शेठजी आपल्या पत्नीसह त्याच रेल्वेने प्रवास करत होते. आपल्यासमोर एक फकिर येऊन बसला आहे आणि तो आपल्या बरोबरीने प्रवास करत आहे, ही बाब त्या दोघांना फारशी रुचली नाही. परंतु स्वामीजींकडे प्रवासाचे तिकीट असल्याने ते त्यांना हाकलून देऊ शकत नव्हते. दोघे नाक मुरडून प्रवास करत होते. त्यांच्या डोळ्यात, वागण्या बोलण्यात स्वामीजींप्रती तिरस्काराचे भाव होते. स्वामीजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

प्रवासात भूक लागल्यावर दोघांनी घरून बांधून आणलेली जेवणाची शिदोरी सोडली आणि स्वामींची नजर पडणार नाही अशा बेतात लपवून खायला सुरुवात केली. त्यांना जेवताना अवघडलेपणा वाटू नये, म्हणून स्वामींनी डोळे बंद करून घेतले व ते काली मातेचे नामस्मरण करू लागले. सबंध दिवस प्रवासात जात होता. 

रात्रीचे बारा वाजत आले. गाडी एका स्टेशनावर थांबली. पाय मोकळे करण्यासाठी स्वामीजी दाराजवळ आले. एवढ्या रात्री रेल्वे फलाटावर एक माणूस ट्रेनच्या प्रत्येक डब्यात डोकावून पाहत धावत स्वामींच्या दिशेने येत होता. स्वामींना पाहताच त्याने नमस्कार केला. पाय धरले आणि हातात जेवणाचा डबा दिला. स्वामीजी म्हणाले, 'आपण कोण आहात, मी आपल्याला ओळखत नाही.'

यावर तो मनुष्य म्हणाला, `स्वामीजी, आपण मला ओळखत नाही, परंतु मी आपल्याला बरोबर ओळखले आहे. काल आमच्या घरी देवीचा उत्सव होता. सगळी पूजा अर्चा पार पडल्यावर मी रात्री झोपी गेलो, तर स्वप्नात देवीने मला दृष्टान्त दिला. झोपतोस काय? ऊठ! माझा भक्त तुझ्या गावी येतोय. तो पूजेचा खरा मानकरी आहे. तो उपाशी आहे. त्याला जेवण दिल्याशिवाय तू दिलेला नैवेद्य माझ्यापर्यंत पोहोचणार नाही...मी तत्काळ जागा झालो आणि देवीने केलेल्या वर्णनानुसार शोध घेत इथे आलो आणि तुम्ही मला भेटलात. मी धन्य झालो स्वामीजी...!'

स्वामीजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी मनोमन काली मातेचे आभार मानले. `आई, किती काळजी घेतेस तू लेकरांची..'

स्वामीजींनी त्या व्यक्तीचा भावपूर्ण निरोप घेतला. गाडी सुटली. स्वामीजी जागेवर येऊन बसले. जेवणाचा डबा उघडू लागले. तेव्हा आतापर्यंत घडलेला प्रकार पाहून शेठ आणि शेठाणी वरमले आणि त्यांनी स्वामीजींची माफी मागितली.

हा प्रसंग पाहता समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकातील पंक्ती आठवतात,
जगी पाहता देव हा अन्नदाता,
तया लागली तत्वता सार चिंता,
तयाच मुखी नाम घेता फुकाचे,
मना सांग पां रे तुझे काय वेचे।।

Web Title: Swami Vivekananda experienced the grace of Goddess Kali many times; one of them was a thrilling incident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.