विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:20 AM2024-05-31T10:20:26+5:302024-05-31T10:26:26+5:30

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: ४५ तास मौन व्रताचरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ नारळ पाणी आणि द्रासाचा रस आहारात घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.

swami vivekananda found the purpose of life that place pm narendra modi doing 45 hours meditation maun vrat and fast | विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!

PM Narendra Modi Vivekananda Rock Meditation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झंझावाती प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट कन्याकुमारी गाठले आणि मौन व्रत तसेच ध्यानसाधनेचा संकल्प केला. ४५ तास नरेंद्र मोदी ध्यानसाधना आणि मौन व्रताचरण करणार आहेत.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ध्यानधारणा, मौन व्रत याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनी तसेच संत-महंत मंडळी यांनी ध्यानधारणा, मौन व्रताचे केवळ आचरणच केले नाही, तर त्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. ध्यान साधनेत मोठे बळ असते. ध्यानधारणा आणि मौन राहिल्यामुळे अनेक प्रश्नांची उकल आपलीच आपल्याला होऊ शकते. मन एके ठिकाणी शांत चित्त केले की, शांततेत विचार केला जाऊ शकतो. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. गौतम बुद्धांनीही ध्यान साधना आणि मौन व्रताचरणातून अनेक गोष्टी साध्य केल्याचे सांगितले जाते. ध्यानाचे आणि मौन व्रताचे अनेक फायदे, लाभ सांगितले जातात. 

कन्याकुमारी आणि स्वामी विवेकानंद

गुरु रामकृष्णांकडून संन्यास दीक्षा घेतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण केले. देशातील परिस्थिती याची देही याची डोळा पाहिली. कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. समुद्रात उडी मारली आणि जवळच असलेल्या शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडला, असे सांगितले जाते.

नरेंद्र मोदींचा ध्यान साधनेचा संकल्प आणि मौन व्रत

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या ७५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० पेक्षा जास्त रॅली, तब्बल १८० रोड शो आणि सभा घेतल्या. संपूर्ण भारतभरातील अनेक मतदारसंघात जाऊन जनतेला संबोधित केले. यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक येथे जाऊन ध्यान साधनेला सुरुवात केली. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सायंकाळी ध्यानाला सुरुवात केली. १ जून रोजी सायंकाळपर्यंत नरेंद्र मोदी ध्यान साधना करणार आहेत. ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले होते, तिथेच पंतप्रधान मोदी ध्यानाला बसले आहेत. 

असा असेल ४५ तासांचा ध्यानकाळ

४५ तासांच्या ध्यानधारणेदरम्यान नरेंद्र मोदी फक्त द्रव आहार घेतील. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस मोदी घेणार आहेत. हे संपूर्ण ४५ तास मोदी मौन व्रतात असणार आहेत. ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. कन्याकुमारी देवीची मूर्ती भगवान परशुरामाने ३ हजार वर्षांपूर्वी स्थापन केली होती, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. एखाद्या पंतप्रधानाने देवीचे दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


 

Web Title: swami vivekananda found the purpose of life that place pm narendra modi doing 45 hours meditation maun vrat and fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.