कीर्तनाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:10 AM2020-06-17T05:10:44+5:302020-06-17T05:11:09+5:30
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे वारकरी कीर्तन.
- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे; मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक
स्वरचित पद अथवा लौकिक भक्तिगीत वारकरी कीर्तनात गायिले जात नाही. ‘आम्ही नाचों तेणें सुखें। वाहूं टाळी गातो मुखें।’ असे वारकरी कीर्तनाचे समूह संकीर्तनाचे सूत्र असते. ‘टाळा-टाळी लोपला नाद। अंगो-अंगी मुराला छंद।’ अशी टाळ व टाळीची चिरतंद्रा वारकरी कीर्तनात अभिप्रेत असते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे वारकरी कीर्तन.
कीर्तन संस्थेचे आद्यप्रवर्तक नारदमुनी समजले जातात. कीर्तनाचा महिमा सांगताना संत तुकारामांनी नारदांची महतीसुद्धा सांगितली आहे.
कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव।
पंढरीचा राव संगीं असे ।।धृ ।।
भक्त जाय सदा हरी कीर्ति गात।
त्यासवे अनंत हिंडतसे।।२।।
त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद।
त्यासवे गोविंद फिरतसे।।३।।
नारद मंजुळ सुस्वरें गीत गाय।
मार्गी चालताहें संगें हरि।।४।।
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची।
नाही आणिकांची प्रीती ऐसी।।५।।
वारकरी कीर्तन हे समूह संकीर्तनाचे प्रतीक आहे, परंपरेनुसार वारकरी कीर्तनकार स्वत: ला ‘बुवा’ म्हणवून घेतात. ‘महाराज’ म्हणत नाहीत. अलीकडे मात्र सर्वत्र ‘महाराज’ म्हणण्याचा प्रघात रूढ झाला आहे. ‘राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी’ या भजनाने प्रथम वारकरी कीर्तनाचा प्रारंभ होतो तो विणेकऱ्यांच्या माध्यमातून. ‘सुंदर ते ध्यान’ हा रूपाचा अभंग आणि ‘रूप पाहता लोचनी’ हा ध्यानाचा अभंग असे अभंग गायिले जातात. ‘विठोबा रखुमाई, जय-जय विठोबा रखुमाई’ असा गजर होतो. कीर्तनकार अभंगांवर निरूपण सुरू करतात तेव्हा उपरण्याने कंबर कसतात. श्रीमद् भगवत गीता, एकनाथी भागवत, संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी यांचीच प्रमाणे देण्याची मर्यादा कीर्तनकारांनी आखून घेतलेली असते.
सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। भक्ती प्रेमविण इतर गोष्टी न कराव्या।। संत संगे अनंत रंगे नाम बोलावे। ऐसी कीर्तन मर्यादा नाथांच्या घरची।
संत एकनाथांनी कीर्तन मर्यादा स्पष्ट केली आहे. ‘मार्ग दावूनि गेले आधी दयानिधी संत ते। तेणेचि पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही’ अशी वारकरी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची श्रद्धा असते. वारकरी संप्रदाय हा नाथ सांप्रदाय आणि चैतन्य सांप्रदाय या दोन सांप्रदाय धारांमधून प्रवाही राहिलेला सांप्रदाय असून वारकरी कीर्तनाचा विचार करताना संत तुकोबांचा वीणा पुढे निळोबाराय आणि त्यानंतर वासकर महाराजांकडे आला आणि फडाचे कीर्तन सुरू राहिले. विष्णूबुवा जोग महाराजांची परंपरा ही नाथ सांप्रदायाकडून म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेवांकडून आली. विष्णूबुवा जोग महाराजांच्या परंपरेत बंकटस्वामी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुतीबुवा ठोंबरे, मामासाहेब दांडेकर अशी कीर्तनकारांची, प्रवचनकारांची परंपरा पुढे सुरू राहिली. वारकरी कीर्तनात दृष्टांत व दृष्टांतातून अभंग सोडविला जातो. ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ अशी वारकºयांची श्रद्धा असते. वारकरी कीर्तन म्हणजे समूह भक्ती. या समूह भक्तीचा सोहळा आता कोरोनाने शक्य नाही.