Tarot Card: ६ ते १२ ऑगस्टचा कालावधी आनंददायी असणार की अवघड, हे तुम्ही निवडलेल्या कार्डावरून ठरेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:10 AM2023-08-05T08:10:51+5:302023-08-05T08:11:10+5:30
Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार वर दिलेल्या तीन कार्डांपैकी जे कार्ड निवडण्यासाठी तुमचं मन कौल देईल ते तुमचं भविष्य असणार आहे.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
6 ते 12 ऑगस्ट
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीचे प्राधान्य घेऊन येत आहे. तुमचे विचार परपक्व होतील, पक्के होतील. असे प्रसंग किंवा अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. मनाचं न ऐकता, डोक्याने काम करावं लागेल. महत्वाचे संवाद घडतील. कडक वागावं लागेल, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा नियम आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. तुम्हाला परखड मत ऐकून घ्यावं लागेल. कामामध्ये विशेष करून नियोजनाचा, आराखडा तयार करण्याचा एक टप्पा गाठला जाईल.
या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा, खरे बोला. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. मोठ्यांसमोर नमतं घ्या. वाद होत असेल तर मुद्दा सोडून बोलू नका, विषयापासून भरकटू नका. पक्षपात करू नका, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा. लोकप्रिय नाही झालात तरी चालेल पण न्यायप्रिय आणि नितीप्रिय वागा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत याची तयारी ठेवा. आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं वाटू शकतं. वादविवाद, स्पर्धा, मतभेद, भांडणं आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाशी तरी भांडण होऊन नुकसान होण्याचे संभवत आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न आवडणारी, न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. तुम्हाला हवा तसा सहकाऱ्यांचा किंवा आप्तेष्टांचा पाठिंबा मिळणार नाही. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.
या आठवड्यात तुम्ही शांत राहायचं आहे. उग्रपणे, अविचाराने किंवा घाईघाईने कोणतेही काम करू नका किंवा निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. आपल्यापुरता विचार करा. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका, वाद किंवा भांडणं स्वतःहून ओढवून घेऊ नका. थोडाफार विरोध करा, पण अतिरेक लढायला जाऊ नका, त्यातून निष्पन्न निघेल अशी अपेक्षा ठेवू नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. तडकाफडकी काहीही करू नका. मानसिक त्रास होत असेल तर ध्यान, मेडीटेशन, मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे यांचा आधार घ्या.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला जरा अवघड असणार आहे. कामात, घर असो किंवा ऑफिस, काहीसं तणावपूर्ण वातावरण असेल. मार्ग पटकन सापडणार नाहीत, उत्तरं मिळणार नाहीत. संवाद नीट होणार नाहीत. गैरसमज निर्माण होतील. बरीच जबाबदारी अंगावर पडेल, त्यामुळे कदाचित मान वर करायला ही वेळ मिळणार नाही. पण चांगली गोष्ट अशी की तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी, किंवा तुमच्या मना विरुद्ध होत असलेल्या काही गोष्टी आता संपणार आहेत, संपायला आल्या आहेत. त्यामुळे एक कटू शेवट होऊन, त्यापुढे निश्चितच एक चांगली सुरुवात होणार आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या विचारांना आळा घालण्याची गरज आहे. अतिविचार आणि नकारात्मक विचार पूर्णपणे झटकून टाका. परिस्थतीशी फार झगडायला जाऊ नका. तुमच्या हातात फक्त स्वतःला सावरण्याचीच सूत्र आहेत. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. समजूतदारपणे वागा. थोडे धडपडलात तरी फार खचून जाऊ नका. थोडी विश्रांती घ्या. मान, पाठ, कंबर आणि डोकं हे काही दुखेल असं मुद्दाम वागू नका. झोप पूर्ण घ्या, रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा.
श्रीस्वामी समर्थ.