Tarot Card: तीनपैकी एक कार्ड निवडा, त्यावरून नवरात्र कशी जाणार तेही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:42 PM2023-10-14T14:42:34+5:302023-10-14T14:42:51+5:30
Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार वर दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
15 ते 21 ऑक्टोबर
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन उत्साह, नवीन आनंद, नातेसंबंधांमध्ये नाविन्य अनुभवता येईल. तुम्ही जे करत आहात, किंवा जे करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल, औषधांना गुण येईल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. भौतिक वस्तू किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अतीविचार यापेक्षा तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकून निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणीसुद्धा लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अरेरावी नको. कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून तुमच्या आवडीच्या विषयात. शांत आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता बाळगा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी मनाचे, भावनांचे प्राधान्य घेऊन येत आहे. असे प्रसंग घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या बुध्दीपेक्षा मनाचं ऐकावं लागेल. मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. प्रेमळ, आदराने वागवणारे, समजून घेणारे लोक भेटतील. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. तुमच्या कलेला वाव मिळेल. काही प्रमाणात राजकारण घडू शकतं. कामामध्ये एक प्रकारचा टप्पा गाठला जाईल.
तुम्हाला तुमचं वागणं बोलणं चांगलं आणि सुसंस्कृत ठेवण्याची गरज आहे. भावनेच्या भरात टोक गाठू नका. तुमच्यावर कोणाला हावी होऊ देऊ नका. ऐकावं मनाचं करावं मनाचं, याप्रमाणे वागा. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा, पण अगदी सगळं उघडपणे सांगू नका. मोठ्यांसमोर नमतं घ्या. वादाच्या प्रसंगी, मोठ्यांचा आदर ठेवा. बोलून घाण करू नका, कोणालाही हिणवू नका. कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची चांगली काळजी घ्या.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. वेगाने गोष्टी घडतील. तुमच्या समोर अशा घटना घडतील, किंवा अशी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला सचोटीचा, संवाद कौशल्याचा आणि बुद्धीचा उपयोग करावा लागेल. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. त्या तुम्ही लोकांना पटवून देऊ शकाल. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. सोशल मीडिया द्वारे तुम्ही चांगला प्रभाव टाकाल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल.
या आठवड्यात अतिशय प्रामाणिकपणे वागा, खरेपणा मुळीच सोडू नका. जेवढं आहे तेवढंच सांगा, वाढवून सांगू नका. रोखठोक वागा, भावनांना बळी पडू नका. तुमचं मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. तुमच्या डोक्यात सुरू असलेल्या संकल्पना आणि विचार इतरांना सांगा. हाती घेतलेलं काम, सारासार बुद्धीने हाताळा. तुम्ही संवाद कौशल्यात कुठे कमी पडत आहात का, याचा विचार करा, आणि त्याप्रमाणे सुधारणा करा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा.
श्रीस्वामी समर्थ.