Tarot Card: हिंदू नववर्षाची सुरुवात दणदणीत; फक्त यशाने हुरळून जाऊ नका; निवडा तुमचे टॅरो कार्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:21 AM2024-04-06T11:21:00+5:302024-04-06T11:21:34+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून साप्ताहिक भविष्य जाणून घ्या!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
७ ते १३ एप्रिल
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. भौतिक मुबलकता राहील आणि त्यांचा उपयोग करण्याची योग्य बुध्दी ही राहील. हवे तसे ध्येय जरी साध्य करायला अवघड असेल तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे वाढणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने एकच बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. उलट सगळीकडे तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून नवीन वर्षाची सुरुवात करा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी अधिकाराचा आणि वर्चस्वाचा असणार आहे. तुम्ही करत असलेले काम मोठे होईल. विस्तार होईल. तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल. बऱ्याच गोष्टींची सूत्रे तुमच्या हातात असतील. त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वडील किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींचा दबदबा राहील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला स्वतः राजा आणि बाकीचे प्रजा अशी भावना येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. पण याचे रुपांतर पोकळ डौलात तर होत नाही ना याची तुमची दक्षता बाळगायला हवी. अती विश्वास, अभिमान, गर्व हे तुम्हाला बाधक ठरु शकतात. म्हणून पाय जमिनीवर ठेवा. सामर्थ्यवान अशी नवीन वर्षाची सुरुवात करा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी घडामोडींचा आणि अनेक घटनांचा असण्याची शक्यता आहे. ज्या मार्गावर आहात किंवा ये करत आहात त्यात बदल घडू शकतो. वेगळी वाट, वेगळे वळण अचानक समोर येऊ शकते. मतभेद, काही वादविवाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. पण यातूनच तुम्ही मागचे सोडून काही गोष्टींचे पुनरुज्जीवन करणार आहात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बदल स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. बदल हा आयुष्याचा नियम आहे, हे लक्षात ठेवून वाटचाल करा. अचानक काही घटना घडल्यामुळे तुम्हाला हवा तसा वेळ मिळणार नाही पण तरी तुम्ही आत्मविश्वासाने अशा प्रसंगातून मार्गक्रमण करु शकणार आहात. मागची कात टाकून नवीन सुरुवात करण्यासाठीच तर हे नवीन वर्ष तुम्हाला सांगत आहे!
श्रीस्वामी समर्थ.