Tarot Card: जुलैचा शेवट आणि ऑगस्टचा पहिला आठवडा कसा जाणार हे ठरवणं आहे तुमच्याच हातात; वाचा भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:45 AM2023-07-29T08:45:44+5:302023-07-29T08:46:55+5:30
Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार आपण दिलेल्या कार्डपैकी मनाचा कौल मिळेल ते तीनपैकी एक कार्ड निवडायचे आणि भविष्य जाणून घ्यायचे.
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
३० जुलै ते ५ ऑगस्ट
===============
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा जास्त राहील. मध्यम गतीने कामं पुढे सरकतील. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कामातील सह कर्मचारी, ओळखीचे लोक यांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. हरवलेली नाती, तुटलेली माणसं पुन्हा एकदा भेटण्याचा आणि त्यांच्याशी छान संवाद होण्याचा संभव आहे. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीत, किंवा तुमचे छंद, कला, क्रीडा यात चांगली प्रगती होऊ शकते. त्यातून तुम्हाला समाधान मिळेल.
या आठवड्यात तुम्ही तुमचं काम वाढवण्यासाठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने कसं प्रभावित करू शकता ते बघा. त्यांना योग्य ऑफर देऊ शकता. घाई करू नका पण संथ ही राहू नका. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचं मान जिंका. एखादा छंद, कला, क्रीडा यातून तुमचा ताण हलका करा. कोणी तुम्हाला काही दिलं तर लगेच विश्वास न ठेवता आधी थोडी खात्री करा. कोणाच्या आमिषाला भुलू नका.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चांगल्या आणि सकारात्मक ऊर्जेने घटना घडतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. निराशेकडून नव्या उमेदीकडे घेऊन जाणारा हा काळ आहे. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकतं. लोकांना तुमच्या कामाची आणि कर्तृत्वाची माहिती होईल. घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. तुम्हाला आतून उत्साह वाटेल, काही गोष्टी मनासारख्या नाही जरी घडल्या तरी तुम्ही खचून जाणार नाही. काही लपून राहिलेल्या गोष्टी समोर येतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.
या आठवड्यात तुम्हाला सचोटी, खरेपणा आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारे वागण्याची गरज आहे. अजिबात लपवा लपवी, फसवा फसवी, गमतीत ही करू नका. पारदर्शी पध्दतीने काम करा. जे आहे ते स्पष्ट आणि सविस्तर समजावून सांगा. एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर नक्की करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा आणि घरामध्ये ज्येष्ठ मंडळींचा मान ठेवा. एखादं यश मिळालं असेल तर हुरळून जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा. कोणालाही कमी लेखू नका. स्वतः स्वतःचं कौतुक करू नका. उलट तुम्ही मोठेपणा घेऊन तुमच्यापेक्षा लहांनाना किंवा तुमच्यापेक्षा कमी असलेल्यांना मार्गदर्शन द्या, प्रोत्साहन द्या.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला, निवड करायला अवघड जाईल. घर, काम, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, तुमच्या स्वतः च्या महत्त्वाकांक्षा या सगळ्यात तुम्हाला काही न काहीतरी सहभाग घ्यावा लागेल. थोडक्यात मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही, कारण तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित नसेल. बरेच पर्याय डोळ्यासमोर येतील, बरेच मार्ग दिसतील, त्यामुळे एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमचं चित्त विचलित न होऊ देण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, आणि त्यामध्ये पुढे वाढण्याचा प्रयत्न करा. खूप वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी हात घालू नका. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. महत्त्वाचे निर्णय घेण्याचं टाळा, किंवा घ्यावा लागलाच तर भावनिक दृष्ट्या घेऊ नका, नीट स्पष्ट बुद्धीने घ्या. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात काहीतरी धडपड करा.
श्रीस्वामी समर्थ.