Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:19 AM2024-09-23T11:19:42+5:302024-09-23T11:20:13+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२२ ते २८ सप्टेंबर
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये नवीन संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे वाढाल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला मजबूत ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. इतरांचे बोलणे किती ऐकायचे हे तुम्ही ठरवा. ध्यान, मेडीटेशन, प्रार्थना करा. पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. "मन चंगा तो कठोती में गंगा" या प्रमाणे तुम्ही मन आनंदी ठेवले तर हा काळ आनंदी!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. पण तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तरीही तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. भरपूर कष्ट करा. वैयक्तिक गोष्टींत खूप वेळ अडकू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. स्वावलंबी व्हा. "एकला चलो रे" या गीतातील शब्द तुमच्या ध्यानात ठेवा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.