Tarot Card: बाप्पाचे नाव घ्या आणि निवडा एक कार्ड आणि वाचा गणेशोत्सवातले साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:20 PM2023-09-16T18:20:49+5:302023-09-16T18:21:37+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार मन कौल देईल ते कार्ड तीन कार्डांमधून निवडायचे आणि त्यानुसार साप्ताहिक भविष्य जाणून घ्या, तुम्हीही निवडा तुमचे कार्ड!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
17 ते 23 सप्टेंबर
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात एका अर्थी तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ कुठेतरी काहीतरी अडथळा येऊ शकतो, काहीतरी कारणामुळे अडकू शकता. थोड्या प्रमाणात खचल्यासारखं वाटू शकतं. थोडा विरोध, विलंब होऊ शकतो, ध्येयामध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने, जोमाने आणि चिकाटीने पुढे चाला. मनाची डगमग होऊ देऊ नका, घाबरु नका. घाई गडबड न करता विचारपूर्वक काम करा. कुठल्याही जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचं खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हा विश्वास ठेवा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. काहीतरी नवीन महत्त्वाच्या घडामोडी घडतील. तुमच्यासाठी नवीन असलेल्या किंवा तुम्हाला ज्याची जास्त माहिती नाही अशा कामासाठी किंवा जबाबदारीसाठी तुमची नेमणूक होऊ शकते. तुम्हाला अगदी पहिल्या पायरीवर असल्यासारखं वाटेल. नाविन्यपूर्ण गोष्टी शिकाल. नव्या संधी, नवीन उमेद, नवी दिशा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात तुम्ही तुमचा अनुभवाचा आणि ज्ञानाचा चष्मा थोडा बाजूला करून आलेलं काम अगदी नवख्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. नवीन काहीतरी शिका, नवीन लोकांशी मैत्री करा. स्वतःला काहीसं मोकळं सोडा म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण कौशल्य ओळखू आणि वापरू शकाल. तुमच्या वाटेत आलेली नवीन संधी स्वीकारा आणि वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवून थोडी रिस्क घेऊ शकता.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. वादविवाद, स्पर्धा, मतभेद, भांडणं आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाशी तरी भांडण होऊ शकतं. मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.
या आठवड्यात तुम्ही शांत राहायचं आहे. उग्रपणे, अविचाराने निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका, वाद किंवा भांडणं स्वतःहून ओढवून घेऊ नका. थोडाफार विरोध करा, पण अतिरेक लढायला जाऊ नका, त्यातून निष्पन्न निघेल अशी अपेक्षा ठेवू नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा.
श्रीस्वामी समर्थ.