Tarot Card: 'लेट पण थेट' असा अनुभव देणारा आगामी आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:00 AM2024-06-29T07:00:00+5:302024-06-29T07:00:02+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या तीन कार्डपैकी एक कार्ड निवडून आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
३० जून ते ६ जुलै
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पण तुमच्या कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. कुठेतरी काहीतरी अडकेल, विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल! आहात त्या परिस्थितीत आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. "मन प्रसन्न तर घर प्रसन्न" असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विवेकबुद्धी, संयम आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. या सगळ्या भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येत आहे. तुमच्यासाठी नवीन असलेल्या किंवा तुम्हाला ज्याची जास्त माहिती नाही अशा कामासाठी किंवा जबाबदारीसाठी तुमची नेमणूक होऊ शकते. तुम्हाला अगदी पहिल्या पायरीवर असल्यासारखे वाटेल. नाविन्यपूर्ण गोष्टी शिकाल. नव्या संधी, नवीन उमेद, नवी दिशा मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही अनुभवाचा आणि ज्ञानाचा चष्मा थोडा बाजूला करून आलेले काम अगदी नवख्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. नवीन काहीतरी शिका, नवीन लोकांशी मैत्री करा. स्वतःला काहीसं मोकळं सोडा म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण कौशल्य ओळखू आणि वापरू शकाल. "फिरुनी नवी जन्मेन मी" याप्रमाणे नवीन संधी स्वीकारा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.