Tarot Card: परिस्थिती काहीशी कठीण, पण त्यावर मेहनतीने करा मात; वाचा टॅरो कार्डचे साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:21 PM2023-12-16T12:21:41+5:302023-12-16T12:22:00+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडा आणि त्यानुसार साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१७ ते २३ डिसेंबर
===============
नंबर १:
हा सप्ताह एक प्रकारचा कुंठित काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. पटापट काही घडणार नाही. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. काहीही करताना विलंब होण्याची शक्यता आहे. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत.
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक, आर्थिक समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादं लहान ध्येय पूर्ण होईल. आर्थिक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. सगळे जण मिळून कुठल्यातरी आनंदात सहभागी होतील.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. एखादा गरजेचा खर्च करुन हवं असलेलं काहीतरी घेऊ शकता.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी निवांत वेळ घेऊन येत आहे. तुमच्या आवडीचं काहीतरी करु शकाल. मागे केलेल्या कष्टाचे फळ काही प्रमाणात मिळेल. उत्साह राहील. लहानसा उत्सव साजरा कराल. समारंभामध्ये सहभागी व्हाल किंवा तुम्ही स्वतः आयोजन कराल. तुमच्या आवडीच्या लोकांशी भेटी होतील. एकमेकांना सहाय्य कराल. तब्येत सुधारेल.
या आठवडयात तुम्ही एकटे राहू नका, लोकांना भेटायला जा. मन मोकळे हसा आणि मन मोकळे बोला. लागेल तशी इतरांना मदत करा. गोड बोलून माणसं जोडा. लोकांचे मत जाणून घ्या, त्यांना बोलतं करा. त्यांनी सांगितलेल्या, सुचवलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. तुमच्या जवळच्या माणसांशी आवर्जून संवाद साधा. स्वार्थबुद्धी सोडा.
श्रीस्वामी समर्थ.