Tarot Card: हा काळ स्वप्नरंजन करण्याचा नाही तर स्वप्नपूर्तीचा आहे; वाचा टॅरो कार्डनुसार साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 08:21 AM2023-12-09T08:21:39+5:302023-12-09T08:22:35+5:30
Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार मन कौल देईल ते कार्ड निवडावे आणि आपले साप्ताहिक भविष्य जाणून घ्यावे.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१० ते १६ डिसेंबर
===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पर्याय निवडीचा आणि त्यावर ठाम राहण्याचा असणार आहे. तुम्हाला दिलेलं काम पार पाडण्यात तुमचा कस लागेल. केलेल्या कष्टांना काही प्रमाणात यश मिळेल. इतरांकडून मदतीचा हात मिळेल. प्रतिसाद चांगला मिळेल. कोणत्याही नात्यात दुरावा आला असेल तर त्यात चांगली सुधारणा होऊ शकते.
या आठवड्यात तुम्ही एका व्यक्तीला, किंवा एका कामाला, किंवा एकाच गोष्टीला तुमचा पूर्ण वेळ देण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक कामे हाताळू नका. कामामध्ये चिकाटी आणि धैर्य ठेवा. दिलेला शब्द पूर्ण करा, त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा. इतरांना सोबत घेऊन पुढे चाला. एकोप्याने आणि चांगल्या भावनेने वागा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी एका कठीण वळणाचा, कलाटणीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. कदाचित हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील पण तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. घाबरु नका, हे बदल गरजेचे असून सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत.
या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी, होणाऱ्या बदलांशी झगडायला जाऊ नका, त्यांचा शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करा, त्यांत अडकून राहू नका. हताश होऊ नका, यांतून एक नवीन सुरुवात होणार आहे.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी एकाच वेळी खूप पर्याय घेऊन येणार आहे. निरनिराळ्या गोष्टींमुळे निर्णय घ्यायला अवघड जाईल. मल्टी टास्किंग करावं लागेल. पण यांपैकी कोणतीही गोष्ट हवी तशी पुढे सरकणार नाही. एकूण थोडी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हवे ते साध्य होण्याची फक्त शक्यता दिसेल पण प्रत्यक्षात तसं घडेल असं नाही.
या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टींमधून एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, आणि त्यामध्ये पुढे वाढण्याचा प्रयत्न करा. खूप काही करायला जाऊ नका, फसवणूक संभवते. वरवर आकर्षक वाटणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भुलू नका. स्वप्नरंजन करत बसू नका, हवेत बोलत राहू नका, प्रत्यक्षात कृती करा.
श्रीस्वामी समर्थ.