Tarot Card: अडलेली कामे मार्गी लागण्याचा काळ; आगामी आठवडा सकारात्मक; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:43 AM2024-11-16T10:43:37+5:302024-11-16T10:44:00+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१७ ते २३ नोव्हेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा आहे. कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल आणि नवीन मार्ग शोधाल! परिस्थितीचा स्वीकार करुन आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. "मन प्रसन्न तर घर प्रसन्न" असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही विवेकबुद्धी आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका, त्या पूर्ण होणार नाहीत. भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील! "मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका!" हे तुमच्यासाठी आहे असे समजा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी मागे केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस हे या सप्ताहात मिळू शकतात. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील. कामातील एक टप्पा यशस्वीपणे गाठाल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. लोकांनी मान दिला, मोठं केलं तर त्यांना खाली पाडू नका. त्यांना एकत्र घेऊन पुढे चाला. सगळ्यांना तुमचा आधार द्या. इतरांसाठी तुम्ही त्यांची ढाल बना. एक आदर्श नेतृत्व करा. अरेरावी करू नका. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष एकाग्र न राहता विचलित जास्त होण्याची शक्यता आहे. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुमची प्रगती होणा, हेच महत्त्वाचे आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. पण तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून हा सप्ताह सामंजस्याने घालवा.