Tarot Card: अधिक श्रावण मासातला पहिला आठवडा कसा जाणार हे ठरेल तुमच्या तीनपैकी एक कार्ड सिलेक्शनवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:54 AM2023-07-15T11:54:05+5:302023-07-15T11:54:28+5:30
Adhik Maas 2023: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडा आणि वाचा तुमचे भविष्य!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
16 ते 22 जुलै
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. वेगाने गोष्टी घडतील. तुमच्या समोर अशा घटना घडतील, किंवा अशी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला सचोटीचा, संवाद कौशल्याचा आणि बुद्धीचा उपयोग करावा लागेल. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. त्या तुम्ही लोकांना पटवून देऊ शकाल. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. सोशल मीडिया द्वारे तुम्ही चांगला प्रभाव टाकाल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल.
अतिशय प्रामाणिकपणे वागा, खरेपणा मुळीच सोडू नका. जेवढं आहे तेवढंच सांगा, वाढवून सांगू नका. रोखठोक वागा, भावनांना बळी पडू नका. तुमचं मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. तुमच्या डोक्यात सुरू असलेल्या संकल्पना आणि विचार इतरांना सांगा. हाती घेतलेलं काम, सारासार बुद्धीने हाताळा. तुम्ही संवाद कौशल्यात कुठे कमी पडत आहात का, याचा विचार करा, आणि त्याप्रमाणे सुधारणा करा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी मागे केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. तुमच्या कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द हे या सप्ताहात मिळू शकतात. लोकांना तुम्ही केलेल्या गोष्टींचा उपयोग होईल, तसं ते सांगतीलही. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील. लोकांची मदत होईल. कोणी मार्गदर्शक असतील तर त्यांच्यामुळे तुमची प्रगती होईल. कामातील एक टप्पा यशस्वीपणे गाठाल.
तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. तुमचं कौतुक होत असेल तर हुरळून जाऊ नका. लोकांनी मान दिला, मोठं केलं तर त्यांना खाली पाडू नका. त्यांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुमच्या टीम मधील सगळ्यांना तुमचा आधार द्या. इतरांसाठी तुम्ही त्यांची ढाल बना. एक आदर्श नेतृत्व करा. विनम्रपणे वागा. अरेरावी करू नका. तुमचे काम, तुमच्या संकल्पना हळू हळू पुढे वाढवा. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चाला. त्यांच्याबद्दल वाईट भावना ठेवू नका.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही करत असलेल्या किंवा आत्तापर्यंत केलेल्या कामाचं आणि कष्टाचं हवं तसं फळ मिळणार नाही. कुठेतरी काहीतरी अडकेल, विलंब होईल. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा कंटाळा येऊ शकतो. काहीही करण्याचा उत्साह कमी होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल. हे सगळं विश्व किती उथळ आहे, याची जाणीव होईल. अध्यात्माकडे पाऊल टाकाल. निरस व्हाल पण निराश होणार नाही. उत्तम विवेकबुद्धी जागृत होईल. लोकांना समजून घ्याल. अडचणींचा सामना शांतपणे कराल. लोकांना मार्गदर्शन कराल.
स्वतः आत्मपरीक्षण करा. आपण कुठे चुकत आहोत, किंवा आपण काय सुधारणा करायला हव्या असे विचार करा. तुमच्या समस्यांचं उत्तर बाहेर न शोधता, तुमच्या विवेकबुद्धी मध्येच शोधा. संयम आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. त्रास करून घेऊ नका. या सगळ्या भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडं अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. एकटे कुठेतरी फिरून या, तुम्हाला तुमचीच उत्तरं सापडतील. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील.
श्रीस्वामी समर्थ.