चहावाल्याला तरी कुठे माहीत होते, की त्याचा देव त्याच्यासमोर उभा आहे; वाचा ही बोधकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 20, 2021 06:15 PM2021-02-20T18:15:26+5:302021-02-20T18:17:04+5:30

आपणही देवदुताची वाट पाहुया आणि कुणाचे तरी आपण देवदूत बनुया....!

The tea-maker knew somewhere that his God was standing before him; Read this parable! | चहावाल्याला तरी कुठे माहीत होते, की त्याचा देव त्याच्यासमोर उभा आहे; वाचा ही बोधकथा!

चहावाल्याला तरी कुठे माहीत होते, की त्याचा देव त्याच्यासमोर उभा आहे; वाचा ही बोधकथा!

Next

ज्योत्स्ना गाडगीळ 

सुखात आपल्याला देवाची आठवण येवो न येवो, दु:खात हमखास आठवण येते. देवाचा बराच धावा करूनही तो मदतीला आला नाही, तर आपली श्रद्धा डळमळीत होते. परंतु, पौराणिक कथांमध्ये भगवंत जसा सगुण रूपात भक्ताच्या मदतीला धावून जात, तसा तो आज आला, तर लोक त्याला सोंगाड्या समजून पळवून लावतील. त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कारण, खरा भगवंत कोणीही पाहिला नाही. म्हणून देव भक्तांच्या भेटीला जाताना वेशांतर करून जातो किंवा दुसऱ्या कोणाला प्रेरणा देऊन आपल्या मदतीस पाठवतो. पण तो आपली मदत करतो, हे नक्की!

लडाख परिसरात आर्मी सैनिकांची एक तुकडी तीन महिन्यांसाठी रवाना होत होती. तुकडीचे प्रमुख मेजर साहेब नेतृत्व करत होते. लडाख परिसर मुळातच गारठलेला, त्यात तपमान घसरल्याने थंडी आणखीनच वाढली होती. मेजर साहेबांसकट सगळेच गारठलेल्या स्थितीत कूच करत होते. सगळ्यांना वाटत होते, की वाटेत घोटभर गरमागरम चहा मिळाला, तर शरीरात थोडी तरी ऊर्जा निर्माण होईल. परंतु त्या भागात चहाची टपरी तर दूरच, पण लोकांचे दर्शनही दुर्मिळ होते.

सगळे जण अंगातील बळ साठवून मार्गक्रमण करत होते. पुढे जात असताना त्यांना वाटेत एक छोेटेसे दुकान दिसले. दुकानाच्या पाटीवर बर्फ साचला होता. सैनिकांनी कुतुहलाने दुकानाच्या पाटीवरील बर्फ दूर केला आणि पाहतो तर काय आश्चर्य? ती एक चहाची टपरी होती. सैनिकांची आणि मेजर साहेबांची नजरानजर झाली. त्या बंद टपरीआड चहाचे सामान मिळाले, तरी चहा बनवून सगळ्यांनाच अमृततुल्य चहाचा घोट मिळणार होता. परंतु, टपरीमालकाच्या अनुपस्थितीत टपरीचे टाळे तोडणे मेजर साहेबांना गैर वाटले. जवान खूपच गारठले होते. नाईलाजाने त्यांनी जवानांना परवानगी दिली आणि टाळे तोडले गेले. टपरीच्या आत दूध वगळता चहाचे सगळे सामान होते. एक दोघांनी पुढाकार घेऊन चहा केला आणि काही क्षणात वाफाळलेल्या चहाचा घोट प्रत्येकाने घेतला. 
चहा पिऊन सर्वांना खुशाली वाटली. पुढचा प्रवास पार करण्यासाठी पुरेस बळ सर्वांना मिळाले. सैनिक पुढे जायला निघाले. मेजर साहेबही आघाडीवर होते. परंतु, त्याक्षणी मेजर साहेबांना काय वाटले कोण जाणे? ते मागे फिरले आणि त्यांनी टपरीवरील चहाच्या रिकाम्या केलेल्या डब्यात हजार रुपए ठेवले आणि टपरीचे दार लोटून सगळे निघून गेले. 

तीन महिन्यांची ड्युटी संपवून मेजर साहेब आपल्या तुकडीसह परत असताना चहाची टपरी उघडी दिसली. आधीच्या तुलनेत थंडी कमी झाली होती. मेजर साहेब टपरी मालकाला जाऊन भेटले व त्यांनी त्याची चौकशी केला, `इतक्या निर्मनुष्य जागेत तुला चहाची टपरी टाकावीशी का वाटली?'

चहावाला म्हणाला, `साहेब, या भागात एक तर अतिरेक्यांची ये-जा असते नाहीतर पर्यटकांची. मी पर्यटकांसाठी चहाची टपरी सुरू केली. पण सामोरे जावे लागले, ते अतिरेक्यांना. त्यांच्या भीतीने मी टपरी बंद केली होती. थोडी थोडी परिस्थिती निवळू लागत असल्याचे पाहून मी पुन्हा टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीचा पाचवा वाढदिवस साजरा करायचा होता. कमाईला दुसरा पर्याय नव्हता. जीव मुठीत घेऊन कामाची सुरुवात करायच्या दृष्टीने आलो. आणि पाहतो, तर कोणीतरी माझ्या टपरीचे सामान संपवले होते. डोक्याला हात लावून मटकन खाली बसलो. माझ्या धक्क्याने शेगडीवरचा चहाचा डबा खाली पडला आणि त्यात हजार रुपये मिळाले. मी पैशांकडे बघतच राहिला़े  देवाने माझी मदत केली या आनंदात मी देवाचे आभार मानले. मुलीचा वाढदिवस आनंदात साजरा केला आणि देवाला साक्षी ठेवून मी पुन्हा माझ्या कामात गढून गेलो. संसार चालवण्यापुरते उत्पन्न मला या व्यवसायात मिळत आहे आणि काय हवे? सगळी देवाचीच कृपा आहे, त्यानेच देवदूत पाठवून मला अर्थसहाय्य केले.'

चहावाल्याची अढळ श्रद्धा पाहता मेजर साहेबांनी जवानांना सत्य सांगण्यापासून थांबवले. त्यांनी तसे का केले, असे जवानांनी विचारले असता मेजर साहेब म्हणाले, `मी काही मोठे दान केले नाही. मी केवळ मोबदला दिला आणि तो देण्याची बुद्धी ईश्वराने दिली. म्हणून आपला आणि चहावाल्याचा क्षण साजरा झाला.'

आपणही सर्वांनी देवावर विश्वास टाकून शक्य होईल तशी मदत करण्यास पुढकार घेतला पाहिजे. आपणही देवदुताची वाट पाहुया आणि कुणाचे तरी आपण देवदूत बनुया....!

Web Title: The tea-maker knew somewhere that his God was standing before him; Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.