घरातील देवघराबाबतीत 'या' गोष्टी तुम्हाला माहितेयत का? या वास्तू टिप्समुळे होईल भरभराट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:20 PM2022-07-15T19:20:21+5:302022-07-15T19:33:48+5:30
देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.
आपल्यापैकी अनेकजणांचा वास्तुशास्त्रावर विश्वास असतो. या वास्तुशास्त्रानुसार जर घरात किंवा ऑफिसमध्ये आपण रचना केली असेल तर त्याचा फायदा होतो असं म्हटलं जातं. घरातील देवघराबाबतही ही काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेचं एक वैशिष्ट्य असतं. त्याचा प्रभाव त्या घरातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडतो असं मानलं जातं. त्यामुळे देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.
- वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर नेहमी ईशान्य दिशेला असलं पाहिजे. देवघरासाठी ही योग्य दिशा आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं याची काळजी घ्यावी. देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं म्हटलं जातं.
- देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे.
- घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
- देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये. लाल रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात. देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते.
- देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. शिवलिंगही घरामध्ये दोनपेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तूशास्त्र सांगतं. तसंच शंख आणि सुर्याच्या प्रतिमाही दोनपेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत. ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते.
घरातील देव्हारा -
वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.
- त्याचबरोबर देवघरात कोणत्याही देवाच्या भंगलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नयेत. अशा मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा राहते. अशा भंगलेल्या मूर्ती लगेचच वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात.
- देवांना कधीही शिळी फुलं वाहू नयेत. तसंच देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. देवघरात वापरली भांडी रोज स्वच्छ धुवून वेगळी ठेवली जावीत.
- घरात सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो, तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही मिळतात असं मानलं जातं.
तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर देवघरासाठी या साध्यासोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.