...दहा हजार वर्षं!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 04:54 AM2020-10-07T04:54:43+5:302020-10-07T04:54:58+5:30
आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?
- धनंजय जोशी
सुट्टीसाठी म्हणून सगळ्या कुटुंबाला, मुलांना घेऊन प्रवासाला जाणाऱ्यांना हा अनुभव आला असेलच. आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?
तशीच एक गोष्ट ! उंंटाचं एक कुटुंब वाळवंटात फिरत असतं - वडील उंट, आई उंट आणि बेबी उंट ! वडील उंट जरा शांत प्रकृतीचे असतात. बेबी उंट सारखा एकच प्रश्न विचारत असतो, ‘बाबा, आपण पोहोचलो का?’
वडील उंट उत्तर देतात, ‘तुला किती वेळा सांगितलंय मी, की आपली भटकणारी जात आहे. आपण कधीही कुठेही पोहोचत नसतो. त्यामुळे आपण फक्त आनंदाने प्रवास करायचा. ‘पोहोचणार कधी?’ असे प्रश्न विचारायचे नाहीत.’ ही गोष्ट पहिल्यांदा वाचली तेव्हा मला जरा हसू आलं. वाटलं, हे वडील उंट बहुतेक सान सा निम यांना पूर्वीच्या आयुष्यात भेटलेले असावेत. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, टेन थाउजंड इयर्स, नॉन-स्टॉप!...’ तुमचं काम एवढंच, की फक्त प्रामाणिकपणे साधना करायची. हे करून आपण कुठे पोहोचणार आणि काय मिळवणार याचा विचार नाही करायचा!
आता दहा हजार वर्षं म्हटल्यानंतर लगबगीने कुठे पोहोचण्याची घाई निघूनच गेली की नाही? आपल्या आयुष्यात अगदी आपल्या दैनंदिन जीवनात ही घाई आपल्याला उगाचच चिंतित करून जात असते. काहीही करून कुठे ना कुठेतरी पोहोचण्याची जरूरच समजा नाहीशी झाली की, आपण शंभर टक्के ‘आत्ताच्या क्षणी’ जगू शकू... ‘आत्ता’ जे आहे, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करू शकू!! एका प्रसिद्ध झेन गुरुंना त्याच्या शिष्याने विचारलं, ‘मास्टर, माझी साधना म्हणजे एखाद्या शिडीवर चढून गेल्यासारखी वाटते. चार पायºया वर आणि तीन पायºया खाली ! मी काय करू?’
झेन गुरु म्हणाले, ‘ते शिडी वगैरे सोडून दे. आपण कुठेही जायचं नाही, की कुठेही चढायचंही नाही. आपलं सगळं काम जमिनीवर!’