कावळ्याला मोराचा हेवा वाटतो आणि मोराला कावळ्याचा; या गोष्टीत दडले आहे मनुष्य जीवनाचे सार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:36 AM2023-07-07T11:36:12+5:302023-07-07T11:36:40+5:30

आपले सबंध आयुष्य दुसऱ्यांचे सुख पाहण्यात आणि तुलना करण्यात निघून जाते, मात्र स्वतःचे सुख बघायचे राहून जाते, त्यासाठीच ही बोधकथा!

The crow is jealous of the peacock and the peacock of the crow; This is the essence of human life! | कावळ्याला मोराचा हेवा वाटतो आणि मोराला कावळ्याचा; या गोष्टीत दडले आहे मनुष्य जीवनाचे सार!

कावळ्याला मोराचा हेवा वाटतो आणि मोराला कावळ्याचा; या गोष्टीत दडले आहे मनुष्य जीवनाचे सार!

googlenewsNext

ही गोष्ट आहे एका प्राण्यांच्या बागेतली. त्या बागेत एक चिंतनशील कावळा रोज फेरफटका मारतो. दुसऱ्यांना पाहता आपल्या काळ्या रंगाकडे बघत सतत स्वतःचा दुःस्वास करतो. अशा वेळी त्याला तलावात पोहणारा पांढरा शुभ्र राजहंस त्याला खुणावतो. मात्र आपल्या काळ्या रंगामुळे आणि कर्कश आवाजामुळे कोणी आपल्याशी बोलेल याची त्याला खात्री वाटत नाही. 

तरीसुद्धा एक दिवस तो धाडस करून राजहंसाला हाक मारतो. त्याचे कौतुक करतो. रूपाचे गोडवे गातो. ते ऐकून राजहंस सुखावतो आणि म्हणतो, माझा पांढरा शुभ्र रंग लोकांना खुणावतोच पण मला तो हिरवागार पोपट आवडतो. किती छान लाल चुटुक चोच आहे त्याची. शिवाय गोड गोड बोलून सगळ्यांचे मन जिंकतो. राजहंसाचे बोलणे ऐकून कावळ्याला पोपटाचा हेवा वाटला. तो उडत उडत त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला. त्याचे कौतुक केले. पोपटाने मिठू मिठू करत आभार मानले व म्हणाला, 'कावळे दादा, माझा पोपटी रंग छान आहेच, पण मी मोराचा रंगीत पिसारा पाहतो ना, तेव्हा आपल्याला दोनच रंग का मिळाले याचे वैषम्य वाटते. 

कावळ्याला वाटले याचा अर्थ मोरच सर्वात सुखी आनंदी असेल, त्यामुळे एकदा त्याची भेट घेऊ. असे म्हणत कावळ्याने मोराची भेट घेतली. मोर आपले कौतुक ऐकून मोहरून गेला. त्याने आपला पसारा फुलवला. ते सुंदर रंग बघून कावळा हरखून गेला. ते बघत असताना कावळा म्हणाला, मोरा तू सर्वात सुंदर आणि सुखी आहेस, नाहीतर मला बघ, मला देवाने एकच रंग लावून पाठवला, निदान पुढचा जन्म तरी मोराचा मिळावा. हे ऐकून मोर हसून म्हणाला, अरे सुंदर दिसण्याचे फायदे असतात तसे तोटेही असतात, आज हेच सौंदर्य लोकांना बघता यावं म्हणून मला पिंजऱ्यात ठेवले आहे. माझे आयुष्य चौकटीत बांधले गेले आहे. अशा वेळी उलट तुझ्या आयुष्याचा हेवा वाटतो, तू म्हणतोस की तुझ्याकडे कोणी बघत नाही, पण म्हणूनच की काय तू स्वच्छंद आयुष्य जगू शकतोयस. त्याचा आस्वाद घे!' 

हे ऐकल्यापासून कावळ्याला स्वतःबद्दल प्रेम वाटू लागले आणि तो आपल्या आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ लागला!

तात्पर्य : आपण माणसंही असेच प्राण्यांसारखे दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत बसतो, त्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानायला शिकलो तर आपल्यालाही स्वतःबद्दल हेवा वाटू लागेल हे नक्की!

Web Title: The crow is jealous of the peacock and the peacock of the crow; This is the essence of human life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.