कामाख्या देवीचा अपमान हा महादेवांचा अपमान; थट्टा करणे पडू शकते महाग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:07 PM2022-06-27T16:07:59+5:302022-06-27T16:08:36+5:30
सद्यस्थितीत राजकीय नेत्यांनी कामाख्या देवीसंदर्भात खळबळजनक विधान केल्यापासून या मंदिराबद्दल चर्चा सुरु आहे. याबाबत पौराणिक संदर्भ पाहणे जास्त गरजेचे आहे.
शंकर पार्वती यांचे सुंदर नाते जगाला परिचित आहे. त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, प्रेम याचा आदर्श जगासमोर आहे. शंकरांनी देवीला आपले अर्धांग संबोधून अर्धनारीनटेश्वर अशी ओळख निर्माण केली. अशा महादेवांना आपल्या पत्नीचा अपमान झालेला कसा काय सहन होणार? हेच सांगणारी कामाख्या देवीची कथा.
देवाधिदेव महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर जगात प्रलय येणार हे आपण यापूर्वीही ऐकले असेल. प्रलय हा केवळ नैसर्गिक नाही तर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रलयंकारी परिस्थिती या आधीही घडून गेल्याचे पौराणिक कथामध्ये आढळते. त्या परिस्थीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणे इष्ट! त्यासाठी जाणून घेऊया कामाख्या देवीचा महिमा!
पुराणानुसार पिता दक्षाच्या यज्ञात पती शिवाचा अपमान झाल्यामुळे सतीने हवनकुंडातच उडी मारली होती, तिचे शरीर भस्मसात झाले आणि तिचे मस्तक बराच काळ महादेव गळ्यात बांधून संतप्त अवस्थेत फिरत होते. त्यांना पत्नीशोकाच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि आत्मभानाची जाणीव करून देण्यासाठी भगवान विष्णूंनी कामाख्या देवीच्या शरीराची ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्या शक्तीपीठाचे रूपांतर तीर्थक्षेत्रात झाले. यापैकी एक पीठ-आसाममध्ये स्थापन केले गेले, जे सध्याच्या गुहाटीसमोर 'नीलांचल पर्वत' नावाच्या टेकडीवर वसलेले आहे. आणि या शक्तीपीठातून प्रकटलेली देवी "कामाख्या देवी" म्हणून ओळखली जाते.
कामाख्या देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती नसून तिथे देवीचा योनी अवशेष आहे. त्या अवशेषांची तिथे पूजा होते. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे)..या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते. साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पर्व असते. त्यावेळेस जगातील सर्वात प्राचीन तंत्र मंत्र शाखेचे अनुयायी कामाख्या मंदिरात पूजेला येतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.गोरक्षनाथ, इस्माईल जोगी यासारख्या तंत्र उपासकांनी हेच स्थान आपले मानले आहे.अनेक भाविकांसाठी कामाख्या देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची तिथे नेहमी रीघ लागलेली असते.
मात्र या देवीच्या पूजेत काहीही बाधा आल्यास, गैरवर्तन घडल्यास देवीचा आणि तिचे पती देवाधिदेव महादेव यांचाही कोप होतो असे भाविक सांगतात. थट्टेतही देवीच्या बाबतीत कोणतेही चुकीचे वक्तव्य महाग पडू शकते. यासाठी देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रार्थना करणेच सर्वार्थाने योग्य ठरेल!