छोट्या मुलाने हट्टाने देव बघायचा ठरवला आणि बघितलासुद्धा; पण कसा? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:00 AM2022-04-26T08:00:00+5:302022-04-26T08:00:01+5:30
आचार्य अत्रे म्हणतात तसे देव देहात लपलेला आहे, त्याला शोधायचे तर फक्त मंदिरात नाही तर एकमेकांत शोधण्याचा प्रयत्न करा, तो नक्की भेटेल!
देवाच्या कृपेने सगळं काही मिळावं अशी आपली अपेक्षा असते, परंतु देव भेटावा अशी इच्छा फार कमी जणांची असते. छोट्या मुलांच्या मनात देवाबद्दल प्रचंड कुतूहल असते. देव भेटावा अशी त्यांची इच्छाही असते. तो बालहट्ट भगवंत कसा पुरवतो, ते पाहूया.
एका मुलाला त्याची आई रोज रामाची, कृष्णाची, महादेवाची अशी देवीदेवतांची गोष्ट सांगत असे. त्या गोष्टी ऐकून ऐकून मुलाच्या मनात देवाबद्दल प्रचंड कुतूहल जागे झाले. तो आईला म्हणाला, मला देवाला भेटायचे आहे, मी काय करू? आई म्हणाली, देवाला मनापासून सांग, मला तुला भेटायची इच्छा आहे, मला एकदा तरी भेट. त्यावर मुलाने विचारले, पण आई देव नेमका ओळखायचा कसा? आई म्हणाली, देव भेटला की तुला एवढा आनंद होईल की तो शब्दात सांगता येणार नाही.
मुलाच्या मनावर ते शब्द कोरले गेले. त्या दिवसापासून तो देवाच्या भेटीची आस ठेवू लागला. देवाकडे भेटीचे मागणे मागू लागला.
एक दिवस अचानक, शाळेतून येता येता मुलाला वाटेत एक म्हातारे गृहस्थ दिसले. पांढरे कपडे, पांढरी दाढी, पण भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना बघून मुलगा थांबला. त्यांच्याकडे बघत राहिला. ते आजोबा म्हणाले, बाळा काय बघतोस? मला भूक लागली आहे, खायला काही नाहीये, म्हणून एका बाजूला बसून आहे. मुलगा म्हणाला, आजोबा आज शाळेतल्या मधल्या सुटीत खेळण्याच्या नादात मी डबा खायलाच विसरलो. तुम्हाला तो डबा देऊ का?
'अरे पण तुलाही भूक लागली असेल ना?', आजोबा म्हणाले.
'मी आता घरीच जातोय, त्यामुळे तुम्ही हा डबा खा मी घरी जाऊन खातो!' असं म्हणत मुलाने डबा आजोबांपुढे धरला. डब्यातली पोळी भाजी खाऊन आजोबांच्या चेहऱ्यावर तृप्त भाव दिसले. ते भाव अगदी देवघरातल्या तृप्त देवासारखे होते. मुलाने आजोबांना नमस्कार केला आणि तसाच नाचत नाचत घरी आला आणि म्हणाला आई मला देवबाप्पा भेटला, थोडा म्हातारा झाला होता पण त्याला भेटून मला खूप आनंद झाला आणि त्यालाही मला बघून आनंद झाला. यावरून मी ओळखलं की तोच आपला देवबाप्पा होता....!
आणि ते आजोबा आपल्या गावी परतले आणि घरी जाऊन मुलगा सुनेला म्हणाले, तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि वाटेत बालरुपात देव भेटला. त्याला भेटून तृप्त झालो. त्यानेच मला प्रसाद दिला आणि भेटीचा आनंद दिला. तोच माझा देव होता...!
यावरून लक्षात येते, आचार्य अत्रे म्हणतात तसे देव देहात लपलेला आहे, त्याला शोधायचे तर फक्त मंदिरात नाही तर एकदुसऱ्यांच्या देहात शोधण्याचा प्रयत्न करा, तो नक्की भेटेल!