'अति घाई संकटात नेई' हा संदेश केवळ महामार्गावर नाही, तर आयुष्यातही महत्त्वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:26 PM2023-07-04T13:26:29+5:302023-07-04T13:26:54+5:30
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे समोर येत असताना त्या प्रसंगातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा; कोणता ते जाणून घ्या!
समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरून गेला आहे. यात कोणी चालकाला दोष आहे, कोणी वाहन मालकाला तर कोणी समृद्धी महामार्ग बनवणाऱ्यांना! वास्तविक पाहता या घटनेतून समोर आलेल्या कारणावरून मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे, तो म्हणजे सावध पवित्रा! म्हणून महामार्गावर आपल्याला ठराविक अंतरावर वेग नियंत्रणात आणण्यासाठी सूचक फलक लावलेले दिसतात. त्या फलकावर दिलेल्या सूचनांचे पालन केले तर केवळ प्रवासच नाही तर आयुष्यात होणारे अपघातही सहज टाळता येतील. कसे ते पहा!
दोन साधू प्रवासाला निघाले होते. वाटेत त्यांना एक नदी पार करायची होती. त्या नदीच्या पलीकडे एक द्वार होते. तिथल्या गावाचा नियम होता की सायंकाळी ते द्वार बंद होते व त्यानंतर गावात कोणालाही प्रवेश मिळत नाही. आधीच उशीर झाल्याने दोन साधू एका नाविकाच्या नावेत बसले आणि त्यांनी नाविकाला लवकर लवकर नाव वल्हवत दुसऱ्या तीरावर न्यायला सांगितली. तो संथ गतीने नाव वल्हवत होता. ते पाहून साधू चिडले आणि म्हणाले, आम्ही तुला आमची अडचण सांगतोय तरी तू तुझ्या मनासारखंच वागतोयस, त्याची शिक्षा पुढे आम्हाला भोगावी लागेल!' त्यावर नाविक शांतपणे म्हणाला, महाराज मला वेळेचा पुरेपूर अंदाज आहे, आपण काळजी करू नका, मी वेळेत तुम्हाला तिथे पोहोचवतो. उगीच घाई गड्बगड केली तर होणारे काम बिघडेल आणि तुमची गैरसोय होईल. म्हणून मला माझ्या गतीने चालवू द्या!'
साधूंचा नाईलाज होता. शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नाविकाला रोजची सवय असल्याने त्याने वेळेत दोघांना दुसऱ्या तीरावर आणून सोडले. साधूंच्या चेहऱ्यावर द्वार बंद होण्याची धाकधूक होती. जेमतेम त्याला मोबदला देऊन दोघे झपझप पावले टाकत द्वाराच्या दिशेने निघाले. त्या गडबडीत एक साधू ठेचकाळून पडले. दुसऱ्याने नाविकाला हाक मारून बोलवून घेतले. त्यांना सावरून तिघे जण द्वाराच्या दिशेने चालू लागले आणि द्वारापर्यंत सोडल्यावर नाविक म्हणाला, 'महाराज आता गावात गेल्यावर उपचार करून घ्या. याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवा, अति घाई संकटात नेई! सगळीकडे घाई करून उपयोग नसतो. काही गोष्टी धीराने, संयमाने घ्याव्या लागतात, तरच काम नीट होते.
म्हणून महत्त्वाची कामे करताना शांत डोक्याने काम करा अशी सूचना मोठयांकडून दिली जाते. नाविकाचा हा सल्ला केवळ साधूंनी नव्हे तर आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. नको तिथे केलेली घाई सर्वांना महाग पडू शकते. यासाठी मनावर संयम बाणायला हवा. समोर गुळगुळीत रस्ता दिसला म्हणून तुफान वेगाने गाडी पळवण्यापेक्षा आपल्या गाडीची क्षमता लक्षात घ्यायला हवी आणि आपल्यावर इतरांचे प्राण विसंबून आहेत या जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. तरच प्रवास सहलीचा असो नाहीतर आयुष्याचा, तो सुखकरच होईल हे नक्की!