पैशाच्या लालसेपोटी हपापलेले माणसाचे मन आणि हृदय मृत्युपश्चातही असंतुष्टच राहते; वाचा ही कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:00 AM2022-04-05T08:00:00+5:302022-04-05T08:00:01+5:30
कधी कोणी तुम्हाला सुख आणि समाधान यापैकी एक पर्याय निवडा सांगितले, तर समाधान हाच पर्याय निवडा, कारण...
एक सम्राट होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या दारावरून कोणीही याचक विन्मुख होऊन परतत नसे, अशी त्याची ख्याती होती. दरदिवशी कामातून ठराविक वेळ काढून तो दानधर्म करत असे. एकदा त्याच्या दरबाराबाहेर याचकांची अशीच गर्दी जमली होती. त्याच गर्दीत एक फकीरही आला होता.
सगळे जण तृप्त होऊन, आनंदून, सम्राटाला आशीर्वाद देऊन परत जात होते. फकिराची पाळी आली. सम्राट म्हणाले, `याचका, तुला हवे ते माग!'
याचकाने आपले भिक्षापात्र सम्राटापुढे केले व म्हणाला, `महाराज, माझे हे पात्र सोन्याच्या नाण्यांनी भरून टाक.' सम्राटाला वाटले, ही मागणी सरळ व सोपी आहे. त्याने सेवकाकडून नाणी आनवली व तो ती पात्रात टाकू लागला. परंतु, गंमत अशी की, कितीही नाणी टाकली, तरी पात्र रिकामेच दिसत होते.
सम्राटाचा पडलेला चेहरा पाहून याचक म्हणाला, `महाराज, तुम्हाला पात्र भरता येत नाही, असे दिसते. मी आपल्या रिकाम्या पात्राने परत जातो. जास्तीत जास्त काय, प्रजा म्हणेल, `आपले सम्राट, वचन पूर्ण करू शकले नाहीत.'
हे ऐकून सम्राट चिडला. त्याने आपल्या खजिन्यातील नाणी आणून पात्रात ओतली. पण व्यर्थ पात्र रिकामे ते रिकामेच.
तेव्हा सम्राट म्हणाला, `याचका, हे कसले तुझे अद्भुत पात्र?'
त्यावर याचकाने हसून सांगितले, 'सम्राट, हे काही जादूचे पात्र नाही. याचे रहस्य अगदी साधे आहे. हे माणसाच्या हृदयाचे बनलेले आहे. तुम्हाला माहित नाही का? माणसाचे हृदय कधीच भरत नाही. संपत्तीने नाही, अधिकाराने नाही, ज्ञानाने नाही. कारण अशा गोष्टींनी भरण्यासाठी मुळात बनविलेच नाही. हे सत्य ज्याला समजले नाही, तो जितके मिळवतो, तितका तो दरिद्री होत जातो. काही प्राप्त झाले, म्हणून हृदयात उत्पन्न होणाऱ्या इच्छा शांत होत नाहीत.
हृदय हे परमात्म्याला साठवण्यासाठी बनवलेले असते. परमात्म्याला मनात साठवायचे सोडून आपण इतर अनेक गोष्टी हृदयात साठवून ठेवतो. चांगल्या-वाईट गोष्टींनी हृदयाची सगळी जागा व्यापून जाते. त्यात नवनव्या गोष्टींची भरच पडत राहते. या विषयांमध्ये गुंतलेली व्यक्ती ईश्वराला विसरून जाते. याउलट ज्या व्यक्तीच्या हृदयात केवळ ईश्वर भरलेला असतो, तिचे हृदय कधीच रिकामे होत नाही. ते केवळ परमानंदाचा अनुभव घेते. त्यामुळे, हे सम्राट तुम्हीसुद्धा स्वत:ला परमेश्वराच्या कार्याचे माध्यम समजा. दानाचा कैफ अहंकाराला खतपाणी घालतो आणि अहंकारी हृदयात परमेश्वर राहूच शकत नाही.'
म्हणून तुम्ही आपले कर्तव्य बजावत राहा आणि म्हणा, 'मला शांती हवी, संतृप्ती हवी, दुसरे काही नको.'
हे ऐकून सम्राटाने याचकाचे पाय धरले.