सुखाच्या मागे जेवढे धावाल ते आणखीनच पुढे धावेल, यासाठी करा एक उपाय ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:00 AM2022-06-16T07:00:00+5:302022-06-16T07:00:02+5:30
अति घाई संकटात नेई, हा फलक केवळ वाहनवेगावर नियंत्रण ठेवा हे शिकवणारा नाही, तर आयुष्यावर नियंत्रण ठेवा हे शिकवणारा आहे!
एका गुरुकुलात गुरुदेव मुलांना बाण मारायला शिकवत होते. एका अतिउत्साही शिष्याने धनुष्य इतके जोरात ओढले की त्याचे दोन तुकडे झाले. गुरुदेवांनी शिष्याला शिकवले की अधीरतेमुळे क्षमता वाया जाते. लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी ऊर्जा वापरून लक्ष्य साध्य करणे अशक्य आहे. आपले जीवनही धनुष्यबाण आहे. संयमाने ऊर्जा जमा करण्याची कला अंगी बाणवायला शिकली पाहिजे, तरच ध्येय कितीही दूर असले तरी असाध्य राहत नाही.
संयमाचा अर्थ फक्त शांतपणे वाट पाहणे असा नाही. संयम म्हणजे उत्तेजित न होता सतत तुमच्या कामात व्यस्त राहणे. कोणत्याही कामाबद्दल उत्साह किंवा असंयम हे त्या कार्याचे फळ परिपक्व होऊ देत नाही. चाकावर आकार घेत असलेला मातीचा घडा तयार होण्याआधीच बाहेर काढला तर त्याचा आकार बिघडून जाईल. त्याला उचित वेळ दिला पाहिजे. रोज थोडी थोडी केलेली प्रगती भविष्यात मोठा बदल घडवत असते.झटपट यशाच्या हव्यासापोटी आपण संयम गमावतो, घाईघाईने निर्णय घेतो, ज्यामुळे आपले भविष्य बिघडू शकते.
तरुणांकडे उर्जेचा साठा जास्त असतो. ही ऊर्जा त्यांना कमी वेळात जास्त काम करून जास्त फळ मिळवण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करते. या ऊर्जेचा योग्य वापर कसा करायचा हे त्यांना माहीत नसते. त्यांना ताबडतोब प्रगती दिसली नाही तर ते नैराश्यात जातात. जीवाचे बरे वाईट करून घेतात. अशा वेळी आपल्या कर्मावर आणि देवावर नितांत श्रद्धा असायला हवी. असे म्हणतात, फांदीवर बसणाऱ्या पक्ष्याला फांदी तुटायची भीती नसते कारण त्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो. तो योग्य संतुलन बाळगून असतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ ब्रायन वाईज म्हणतात, “आध्यात्मिक विकास म्हणजे संयम राखणे. सहनशीलता ही नियतीला त्याच्या नैसर्गिक गतीने पुढे जाण्यास अनुमती देते.' हे लक्षात ठेवा आणि धीर धरा. तुमचीही प्रगती होत आहे आणि एक ना एक दिवस तुम्ही स्वकष्टावर आपले ध्येय गाठणार आहात. त्यासाठी सुखाच्या मागे धावणे सोडा. आपले कर्तव्य करत राहा, सुख आपोआप तुमच्या जवळ येऊन बसेल, खात्री बाळगा!