हात लावू तिथे सोनं करण्याची ताकद केवळ गोष्टीतल्या राजाकडे नाही, तर तुमच्याकडेही आहे ; कशी ते बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:19 PM2022-04-08T12:19:33+5:302022-04-08T12:20:05+5:30
जर तुम्हाला जीवनात भरपूर पैसा कमवायचा असेल आणि श्रीमंत व आनंदी राहायचे असेल तर काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुढील गोष्टींचा अवलंब केलात तर तुम्हाला नेहमीच अपार संपत्ती आणि सन्मान मिळेल.
मिडास राजाची गोष्ट आपण बालपणापासून ऐकली आहे. तो राजा जिथे हात लावी त्या वस्तूचे सोने होत असे. तेव्हापासून ती म्हणच बनली. त्या म्हणीचा गर्भितार्थ असा की एखादा प्रयत्नवादी किंवा भाग्यवंत असा असतो की त्याला अपयशाचे तोंड बघावेच लागत नाही. त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळते. ती व्यक्ती मिडास राजासारखी एखाद्या वस्तूची, परिस्थीची किंमत सोन्यासारखी करून टाकते. तुम्हालाही अशा भाग्यवंतांपैकी एक व्हायचे असेल तर काही नियम पाळावे लागतील.
महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती यशस्वी आणि आनंदी जीवन कसे मिळवायचे ते सांगते. श्रीमंत कसे व्हावे हे देखील त्यांनी सांगितले आहे आणि पैशाचे नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टींबद्दल इशारा देखील दिला आहे. चाणक्य नीतीच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणल्या तर व्यक्ती कधीही अडचणीत येत नाही. तसेच धनवान होऊन आनंदी आयुष्य जगते.
चला जाणून घेऊया चाणक्य नीतीच्या त्या गोष्टींबद्दल, ज्या व्यक्तीला केवळ अपार संपत्तीच देत नाहीत, तर त्याला नेहमी श्रीमंतही ठेवतात. समाजात आदर मिळवून देतात. आपणही उघडूया आपल्या भाग्याची द्वारे!
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांच्या मनात नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगली भावना असते, इतरांना मदत करण्याची वृत्ती असते, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे आपोआप नष्ट होतात. असे लोक टप्प्याटप्प्याने पैसा कमावतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुखाचा आनंद घेतात. त्यांना आयुष्यात कसलीही कमतरता जाणवत नाही.
जे लोक धर्मादाय कार्यात व्यस्त आहेत. समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडतात. गरजूंना मदत करतात, त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते. असे लोक कोणतेही काम, व्यवसाय करतात, त्यात त्यांना भरपूर यश मिळते आणि समाजात त्यांना खूप सन्मानही मिळतो.
ज्यांनी केवळ आपले शरीर आणि मनच नाही तर पैसाही परोपकारात गुंतवला, त्यांच्या घरात पैशाची तिजोरी नेहमीच भरलेली असते. त्यांच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत, आल्या तरी त्या सहज पार केल्या जातात. त्यांचा वंशही वृद्धिंगत होतो.
थोडक्यात जो स्वतःच्या कर्तव्याबरोबर दुसऱ्यांच्या मदतीला धावतो त्याला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा, आनंद, समाधान यापैकी कसलीही उणीव भासत नाही. त्यांची प्रगती भले कासवाच्या गतीने होत असली तरी ते इतर सशांच्या तुलनेत सातत्य ठेवून स्पर्धा जिंकतात आणि आपले ध्येयदेखील गाठतात!