महाभारत काळापासून आहे राजदंड देण्याची प्रथा; काय आहे त्यामागचा अर्थ? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:42 PM2023-05-29T16:42:59+5:302023-05-29T16:43:42+5:30
राजदंडाचे मानकरी असणाऱ्यांना मिळणारे अधिकार कोणते आणि राजदंडाची रचना काय सुचवते? महाभारत काळात तो कोणाला मिळालेला ते पाहू!
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मगुरूंच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंड बहाल करण्यात आला. ही अतिशय प्राचीन परंपरा आहे. तमिळनाडूच्या जुन्या मठाच्या अधिनाम महंतांच्या हस्ते तो राजदंड पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आणि आपली संस्कृती पुनश्च रुजवण्यात आली आहे. राजदंड केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे, प्रजेसाठी समर्पित राहण्याची!
राजदंड हे सुबत्तेचे प्रतीक आहे. तो शासनकर्त्यांच्या हाती यासाठी सोपवला जातो, जेणेकरून त्याच्या राज्यात सर्व प्रजा धन धान्याने परिपूर्ण राहो आणि तसे ठेवण्याची क्षमता शासनकर्त्याला मिळो. तो एकार्थी लक्ष्मी मातेचा वरदहस्त मानला जातो. म्हणून त्याची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळते.
महाभारतातही आहे राजदंड दिल्याचा दाखला
रामायण-महाभारताच्या कथांमध्ये असे वारसाहक्क सोपवल्याचे उल्लेख आढळतात. या कथांमध्ये मुकुट घालणे, मुकुट परिधान करणे हे सत्ता सोपवण्याचे प्रतीक म्हणून वापरलेले दिसते, पण त्यासोबतच एक धातूची काठीही राजाला देण्यात येत, ज्याला राजदंड असे म्हणत असत. महाभारतात युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळीही याचा उल्लेख आहे. शांतीपर्वात त्याविषयी सांगताना 'राजदंड हा राजाचा धर्म आहे, प्रजेचे रक्षण आणि आर्थिक सुबत्ता आणणे हे त्याचे कर्तव्य मानले जाते. तसे करण्यासाठी तो वचनबद्ध असतो.' राजदंड हे राजाच्या स्वैराचाराला आळा घालण्याचे साधनही आहे. महाभारत काळात महर्षी व्यासांनी तो धर्मराज युधिष्ठिराला सोपवला होता.
दंड हा शिक्षेसाठी सुद्धा वापरला जातो. राजाची प्रजा गुण्यागोविंदाने नांदावी म्हणून त्याची न्यायव्यवस्था चोख असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. राजाने निःपक्षपातीपणे दोन्ही गटांची बाजू ऐकून मगच न्यायनिवाडा करायला हवा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन राज्यात समता, बंधुता, शांतता प्रस्थापित केली पाहिजे. यासाठी त्याच्या हाती असलेली शक्ती म्हणजे राजदंड! मात्र राजाचे सगळेच निर्णय योग्य असतील असे नाही. आताच्या काळात जसे सर्वोच्च न्यायालय असते तसे त्याकाळात धर्मगुरूंना ते स्थान होते. राजाकडे उचित न्याय न मिळाल्यास प्रजा धर्मगुरुंकडे फिर्याद करू शकत असे. म्हणून राजदंड राजाच्या हाती असला तरी ते सोपवणारे धर्मगुरू राजाहून श्रेष्ठ मानले जात असत. राज्याच्या कारभारात ते ढवळाढवळ करत नसत, परंतु राजाकडून काही चूक घडत असल्याचे कळताच त्या विषयात हस्तक्षेप करून न्यायदान करत असत.
असाच राजदंड नव्या संसद सदनाला आणि १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला पुनश्च मिळाला आहे. त्यामुळे देशात सुबत्ता, शांतता आणि वैभवसंपन्नता प्रस्थापित होईल अशी आशा बाळगूया!