सूर्यग्रहणाला सुरुवात, ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:25 PM2022-10-25T16:25:24+5:302022-10-25T16:25:43+5:30
NASA आणि Timeanddate.com या दोघांनीही सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट लाईव्ह लिंक जारी केली आहे.
नवी दिल्ली - साल २०२२ मधील अखेरच्या सूर्यग्रहणास सुरुवात झाली असून आइसलँड येथून दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण भारतात दुपारी ४ वाजून २९ मिनिटांनी दिसेल. सूर्य ग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाची गणना अशुभ घटनांमध्ये केली जाते. त्याचमुळे या काळात शुभ कार्य आणि पूजापाठ केला जात नाही. असे मानले जाते की सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याला त्रास होतो, त्यामुळे सूर्याची शुभ्रता कमी होते. चला तर जाणून घेऊया सूर्यग्रहणाची वेळ(Surya Grahan 2022)
२५ ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण आइसलँडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी २.२९ वाजता सुरू झाले आणि अरबी समुद्रात संध्याकाळी ६.२० वाजता समाप्त होईल. भारतात हे सूर्यग्रहण सुमारे ४.२९ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.०९ वाजता संपेल.
भारतातील 'या' ठिकाणी सूर्यग्रहण दिसणार
हे खंडग्रास सूर्यग्रहण प्रामुख्याने युरोप, ईशान्य आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. भारतात हे ग्रहण नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरा येथे दिसणार असून, हे सूर्यग्रहण पूर्व भारत वगळता संपूर्ण भारतात पाहता येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
थेट सूर्यग्रहण कसे पहावे?
NASA आणि Timeanddate.com या दोघांनीही सूर्यग्रहण पाहण्यासाठी थेट लाईव्ह लिंक जारी केली आहे. याद्वारे जगभरातील लोकांना ही आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहता येणार आहे. याशिवाय 'रॉयल ऑब्झर्व्हेटरी ग्रीनविच'च्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही सूर्यग्रहण लाईव्ह पाहू शकता.
The #SolarEclipse today will be visible to most of India except North Eastern region.
— Resonant News🌍 (@Resonant_News) October 25, 2022
It will last 1 hour 45 mins, though southern states will witness is for less than an hour.
The eclipse will begin in India before sunset, according to the Ministry of Earth Science. pic.twitter.com/1PeB5kROqp
सूर्यग्रहणाचा या राशींवर परिणाम होण्याची शक्यता
वर्षातील या शेवटच्या सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर राहील. मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा वाईट परिणाम पाहायला मिळेल. कर्क राशीचे लोक या काळात पैसा कमावतील. कन्या राशीच्या लोकांना या काळात नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याची शक्यता आहे आणि धनु राशीच्या लोकांना या काळात लाभ होईल.
सूर्यग्रहणात काय करावे आणि काय करू नये?
या काळात वृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुले वगळता सर्वांनी झोपणे, खाणे पिणे टाळावे. संपूर्ण ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेषत: एकाच जागी बसावे. तुम्ही बसून हनुमान चालीसा वगैरे पाठ करू शकता. त्यातून होणारा ग्रहणाचा प्रभाव त्यांच्यावर कुचकामी राहील.
आकाशातील ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये कारण सूर्याच्या किरणांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. दुर्बिणीनेही सूर्यग्रहण पाहू नये. हे पाहण्यासाठी फक्त खास बनवलेला चष्मा वापरावा. ग्रहण काळात चाकू, धारदार वस्तू वापरू नका. या दरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे. ग्रहण काळात स्नान आणि पूजा करू नका, ही कामे ग्रहण काळात शुभ मानली जात नाहीत.