पावसाळ्यात दिसणाऱ्या बेडकाची गोष्ट शिकवेल आयुष्याचा मोठा धडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:00 AM2023-08-12T07:00:00+5:302023-08-12T07:00:06+5:30
ही बोध कथा आपल्याला आपल्या आयुष्यातील नैराश्यातून बाहेर पडायला मदत करेल, ती मन लावून वाचा!
आपल्याकडे काय आहे, त्यापेक्षा आपल्याकडे काय नाही, हे पाहण्यात आपला बराच वेळ खर्च होतो. वरून दुसऱ्याकडे असलेले सुख माझ्याकडे का नाही, या विचारात दैवाला, नशिबाला दोष देण्यात आपली बरीचशी ऊर्जा वाया जाते. वरून नैराश्य येते ते वेगळे!
परंतु यात दोष दैवाचा नसून आपला आहे, हे लक्षात घ्या. आपण जे आहोत, जसे आहोत, आपली जी परिस्थिती आहे, त्याला आपण जबाबदार आहोत, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. कारण यश मिळवण्यात नशीबाची साथ वीस टक्के आणि आपल्या श्रमांची साथ ८० टक्के असावी लागते. हे गुणोत्तर आपल्याला साधता आले, तर आपण लढाई जिंकलीच म्हणून समजा! त्यासाठी पुढे दिलेली गोष्ट लक्षपूर्वक वाचा.
एक विज्ञानाचे शिक्षक असतात. बऱ्याच वर्षांनी त्यांना त्यांचा जुना विद्यार्थी भेटतो. ते त्याला आग्रहाने घरी घेऊन येतात. त्याची चौकशी करतात. विद्यार्थी नन्नाचा पाढा सुरू करतो. मला संधी मिळाली नाही, दैवाने मला साथ दिली नाही, जे मिळाले त्यात गुजराण करावी लागली, त्यामुळे माझी परिस्थती आज साधारण मनुष्यासारखी आहे.
शिक्षक आपल्या भूमिकेत गेले आणि म्हणाले, 'चल तुला आज एक प्रयोग दाखवतो!'
विद्यार्थी शिक्षकांपाठोपाठ त्यांच्या स्वयंपाकघरात गेला. शिक्षकांनी एक पातेले घेतले आणि त्यात एक बेडूक पकडून टाकला. बेडून मस्त पाण्यात खेळत होता. शिक्षकांनी ते पातेले गॅसवर ठेवले आणि आच सुरू केली. पाणी हळू हळू गरम होऊ लागले. बेडूक अस्वस्थ होऊ लागले. पाणी उकळू लागले आणि त्या गरम पाण्यात बेडूक हकनाक मेले.
विद्यार्थी ओरडला. `सर हे काय करताय? हा कसला प्रयोग करताय. तुमच्यामुळे तो बेडूक अकारण जिवानीशी मेला. का मारले तुम्ही त्याला?'
शिक्षक म्हणाले, `त्याला मी नाही मारला, तो त्याच्या कर्माने मेला. पाण्याचे तपमान वाढू लागल्यावर पाण्याबाहेर उडी मारायची सोडून तो मदतीची वाट पाहत राहीला. याऐवजी सगळे बळ एकवटून त्याने पाण्याबाहेर उडी घेतली असती, तर तो वाचला असता. पण दैवावर विसंबून राहिला आणि मेला...!'
विद्यार्थ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने शिक्षकांचे पाय धरले आणि म्हणाला, `सर माझं बेडूक होण्याआधी मला पाण्याबाहेर उडी मारायला शिकवलेत त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहिन!'
या शिकवणुकीपायी एका बेडकाचा जीव गेला, हे या गोष्टीचे तात्पर्य नाही. या कथेकडे रुपक कथेच्या नजरेतून बघा आणि पाणी नाकातोंडाशी येण्याआधी उडी मारून नैराश्यातून, अपयशाच्या गर्तेतून बाहेर निघा! कारण तुम्हीच तुमचे भाग्य घडवू शकता, अन्य कोणीही नाही!