...तर दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:45 PM2020-08-08T19:45:05+5:302020-08-08T19:45:29+5:30
डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले
- नीता ब्रह्मकुमारी
एकदा एक व्यक्ती रेल्वेच्या जेवणाच्या डब्यात बसून जेवत होती. त्याच्यासमोर एक अनोळखी जोडपे बसले होते. त्या स्त्रीने उंची वस्त्रे आणि हिऱ्याची किमती आभूषणे घातली होती, पण ती आनंदी दिसत नव्हती. ती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्र ार करत होती की, ही जागा किती घाणेरडी आहे, देण्यात आलेली सेवा चांगली नाही आणि अन्न तर अगदीच गचाळ, पण तिचा पती याउलट अगदी मनमोकळा, गोड स्वभाव आणि सर्व गोष्टी सहजतेने घेणारा.
डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. पत्नीची ओळख करून देताना स्मित हास्य करत म्हणाला की, ‘माझी पत्नी उत्पादन व्यवसायात आहे.’ तिच्याकडे बघून थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, कारण ती एखाद्या कारखानदार वा व्यावसायिकासारखी वाटत नव्हती. म्हणून ती व्यक्ती विचारते, ‘कशाचे उत्पादन करता?’ त्याने मस्करीत उत्तर दिले की, ‘ती तिच्याच दु:खाचे उत्पादन करते’ हे उत्तर ऐकून तिथले वातावरण बर्फासारखे थंडगार झाले.
खरेच या महिलेसारखे कित्येकजण असे आहेत की, ते नकारात्मक विचारांनी स्वत:च्या जीवनात सतत दु:खाचे उत्पादन करीत असतात, पण हे सत्य आहे की, आपले विचार आणि दृष्टिकोनाद्वारे आपण आपल्यासाठी सुख किंवा दु:ख निर्माण करण्याचे साहित्य गोळा करत असतो. आनंदी राहण्याची सवय स्वत:ला लावण्याची गरज आहे. जसे एखादे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आवश्यक असते. त्यात काही वस्तू बिलकूल निकामी असतात; परंतु त्यापासून काही उत्तम बनवले जाते.
सुखाची निर्मिती करायची असेल तर वाईट प्रसंगातून मिळालेली शिकवण, आपली सहनशक्ती, व्यक्तींची खरी ओळख असे फायदेही असतात. ते पाहायची सवय लावली तर सर्वोत्तम असे करू शकतो. ‘काहीही असो मला आनंदी राहायचंय’ हे वारंवार लक्षात आणल्याने दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल.