गुरूच्या अस्तामुळे एक महिना विवाह मुहूर्त नाहीत; विवाहोत्सुक तरुणाईला थोडे थांबावे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 11:53 AM2023-04-05T11:53:56+5:302023-04-05T11:55:31+5:30
आता मे-जूनमध्येच लग्नाचा धूमधडाका
श्यामकांत सराफ, लोकमत न्यूज नेटवर्क, पाचोरा (जि. जळगाव) : गेल्या पाच महिन्यांपासून सर्वत्र सुरू असलेली लग्नसराईची धामधूम गुरुच्या अस्तामुळे थंडावणार आहे. यामुळे विवाहोत्सुक तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. गुरुच्या अस्तामुळे एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे मे व जून महिन्यांत लग्नाचा धूमधडाका उडणार आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत अडचण
मे महिन्यात १४ तर जूनमध्ये १२ अशा एकूण २६ विवाह मुहूर्तांच्यापैकी काही महत्त्वाच्या तारखांसाठी आतापासूनच वधू व वराकडील मंडळींनी मंगल कार्यालय, मंडप केटरर्स, वाजंत्री बुक करायला सुरुवात केली आहे. विवाह विधीसाठी गुरुबल असणे आवश्यक असते. एप्रिल महिन्यात गुरुचा अस्त असल्याने हा काळ विवाहासाठी वर्ज्य ठरवण्यात आला आहे. त्यामुळे मे, जून महिन्यांत लग्नासाठी मंगल कार्यालय मिळणे मोठे कठीण जाणार आहे. पुढे जुलै ते २७ नोव्हेंबरपर्यंत गुरुचा अस्त व त्यातून चातुर्मास असल्याने नोव्हेंबर अखेरपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे.
केवळ गौण काळात विवाह मुहूर्त
एप्रिल महिन्यात गुरुचा अस्त असला तरी या महिन्यात काही गौण काळाचे मुहूर्त आहेत. मुला-मुलींची पत्रिका व कुंडली पाहून विवाह करता येऊ शकतात. -विनायक जोशी, पुरोहित
असे आहेत विवाह मुहूर्त
मे- २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून- १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८
(जुलै ते २७ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा गुरुचा अस्त व चतुर्मासमुळे विवाह मुहूर्त नाही.)