आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 8, 2021 12:28 PM2021-04-08T12:28:10+5:302021-04-08T12:28:38+5:30
या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!
आपण केवळ कुठून काय, कधी मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कुठे, कधी, काय द्यायचे हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे, देण्याची नाही. दिल्याने गोष्टी कमी होतात आणि घेतल्याने वाढतात, एवढाच हिशोब आपल्याला माहित असतो. परंतु अशा दोन गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात. त्याचा वापर आपण कधी केलाय का? त्या दोन गोष्टी म्हणजे सुहास्य आणि सदिच्छा! या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!
एकदा एका बांधकामाच्या ठिकाणी अभियंता देखरेख ठेवत होता. काम सुरळीत चालले होते. अशातच त्या धुळीने माखलेल्या परिसरात एक बालमूर्ती डोक्यावर वीटांचा भार वाहून नेत होती. अभियंत्याने हाक मारून त्या मुलाला जवळ बोलावले. त्याला कोणी कामावर ठेवले म्हणून विचारणा केली. मुलगा घाबरला, तो हात जोडून म्हणाला, `मीच ठेकेदाराच्या हातापाया पडून हे काम मिळवले आहे, माझे काम काढून घेऊ नका.'
अभियंता म्हणाला, `बालमजरांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. तुझे वय काम करण्याचे नाही, शाळेत जाण्याचे आहे. तू शाळेत जात नाहीस का? तुझ्या वडिलांनी तुला कामाला जा सांगितले का?'
मुलगा म्हणाला, `नाही, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत पाठवले होते. तिथे खिचडी मिळते म्हणून. पण त्याने फक्त माझे एकट्याचे पोट भरले असते. ते दोघे उपाशी राहिले असते. म्हणून शाळेत न जाता मी इथे कामाला आलो. रोजंदारी मिळाली, तर आई वडिलांचेही पोट भरू शकेन.'
'तुझे वडील काम करत नाहीत का?'- अभियंता म्हणाला.
'करतात ना, इथे तेच काम करत होते. परंतु गेल्या आठवड्यात सामानाची ने आण करताना अपघात झाला आणि त्यांचा पाय जखमी झाला. त्यामुळे ते कामाला येऊ शकले नाहीत आणि आमच्या घराचे अन्न पाणी बंद झाले. म्हणून मी कामावर आलो.'
मुलाचे बोल ऐकून अभियंत्याला आपले बालपण आठवले आणि कष्ट करून इथवर केलेला प्रवास आठवला. अभियंता म्हणाला, `तुला पाढे पाठ आहेत? कितीपर्यंत येतात? मला लिहून दाखवशील?'
मुलगा हुशार होता. हो म्हणत लगेच त्याने कागद पेन्सिल घेऊन पंधरा पर्यंतचे पाढे स्वच्छ हस्ताक्षरात लिहून दाखवले. ते पाहून अभियंत्याने त्याची पाठ थोपटली आणि ठेकेदाराला बोलावून घेत पंधरा दिवसांचा पगार मुलाला द्यायला लावला. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घ्यायला सांगितली. अभियंता मुलाला म्हणाला, 'बाळा, ही तुझी रोजंदारी नाही, तर हा पगार आहे. जो शिक्षण पूर्ण करून नोकरी केल्यावर मिळतो. तू इमानदारीने आणि हुशारीने पंधरा पाढे लिहिले, त्याचा पंधरा दिवसांचा पगार. पुढच्या पंधरा दिवसात १६-३० पाढे पाठ करून ये आणि आणखी पंधरा दिवसांचा पगार घेऊन जा. तोवर तुझे वडील बरे होतील आणि तुला मजुरी न करता शाळेत जाता येईल. तुझी खरी जागा शाळेत आहे. मेहनत घ्यायची तर शिक्षणात घे, बाकी गोष्टी आपोआप मिळतील. भविष्यात तूही माझ्यासारखा अभियंता होशील आणि दुसऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगशील.'
मुलगा आनंदाने घरी गेला. त्याचे आयुष्य सावरता आले, याचा अभियंत्याला आनंद झाला. त्याने एकाच वेळी सुहास्य आणि सदिच्छा यांची भेट देऊन मुलाला सन्मार्गाला लावले. तेच काम आपल्यालाही कोणाच्या बाबतीत करता आले तर किती बरे होईल ना?