नमस्काराचे तीन मुख्य प्रकार आहेत, त्यापैकी मुख्य आणि लाभदायक नमस्कार कोणता ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:05 PM2022-03-22T13:05:01+5:302022-03-22T13:05:18+5:30
नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक, वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला.
नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात, असे म्हणतात. नमस्कार करण्यात नम्र भाव असतो. जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठायी अहंकार असतो, ती ताठ राहते. परंतु, ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांपुढे, माता-पित्यांपुढे, वडिलधाऱ्या मंडळींपुढे, अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते. परंतु आजच्या काळात नमस्कार करणे, हे कमीपणाचे वाटते. नमस्कार कर, असे मुलांना सांगावे लागते. कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत. मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार, गुडघ्यावर बसून डोके टेवकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती.
पूजेत जे षोडशोपचार आहेत, त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे. दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार. देव देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते. नमन, प्रणाम, प्रणती, नती, दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत.
या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसकि हे ते तीन प्रकार आहेत. कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय. तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण, हा नमस्कार करते वेळी हृदय, माथा, पाय, गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात, म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात. या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो. सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो. हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे.
हरि ऊँ, रामराम, हरहर महादेव, जयजय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो, हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे. विशेषत: आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी `हरगंगे भागीरथी' असे म्हणतात. गंगेला तर हिंदुमात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे. जीवनात एकदा कधी तरी काशीला हरद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे, हा झाला मानसिक नमस्कार. तेथे जाणे शक्य झाले नसेल, तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो.
म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक, वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला.