पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 6, 2020 07:53 PM2020-10-06T19:53:07+5:302020-10-06T20:17:54+5:30
नाण्याला दोन बाजू असतात, तशा प्रत्येक विचाराच्या दोन बाजू असतात. प्रत्येक विचारांची शास्त्रीय कारणे शोधावीत, तज्ञांचा सल्ला घ्यावा, मगच अनुमान काढावे.
ज्योत्स्ना गाडगीळ
आताच्या काळात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट इ. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्ञानाची कवाडे सताड उघडी झाली आहेत. त्यामुळे, कालपर्यंत चारचौघात बोलता, सांगता येणार नाही, अशा विषयांवरही थेट भाष्य होत आहे. ज्या गोष्टी पूर्वी कॉलेजवयापर्यंत आपल्याला माहित नव्हत्या, त्या अलीकडे तिसरी-चौथीच्या मुलांनाही माहित असतात. या सगळ्या माहितीचा अमोघ स्रोत पाहता, `विज्ञान शाप की वरदान' हा चर्चेचा स्वतंत्र विषय ठरेल. परंतु, इथे आपण चर्चा करणार आहोत, अशा काही समजुतींशी, ज्याला आपण विज्ञानयुगात अंधश्रद्धा म्हणत कालबाह्य ठरवले. परंतु, त्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेतले, तर पूर्वजांची दूरदृष्टी आपल्यालाही लक्षात येईल. चला तर प्रकाश टाकूया, अशाच काही पारंपरिक रुढींवर!
नाण्याला दोन बाजू असतात, तशा प्रत्येक विचाराच्या दोन बाजू असतात. आपण आपल्या मानसिकतेनुसार, पूर्वपिटीकांनुसार कोणतीही गोष्ट समजून घेण्याआधी नाकारतो नाहीतर स्वीकारतो. अशी दोन्ही टोकं न गाठता, मध्य गाठावा. शास्त्रीय कारणे शोधावीत, तज्ञांचा सल्ला घ्यावा, मगच अनुमान काढावे. तसाच केलेला हा प्रयत्न.
हेही वाचा: 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो
रात्री पिंपळाच्या पारावर जाऊ नये.
भूताखेतांच्या गोष्टींनी पिंपळपाराला नाहक बदनाम करून ठेवले आहे. वास्तविक, प्रत्येकाने कधी न कधी पिंपळाचे जाळीदार पान आपल्या वहीच्या पानांमध्ये जपून ठेवलेले असते. पिंपळाच्या सळसळत्या पानांचा उत्साह अनुभवलेला असतो. पानगळतीचा आणि नवपल्लवीचा सोहळा पाहिलेला असतो. तो इतका नवनवोन्मेषशालीन आहे, की भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर जागा मिळेल, तिथे वाढतो. त्याचे आयुष्यही खूप, म्हणून त्या 'अक्षय वृक्ष' म्हणतात. पिंपळाच्या झाडापासून `लाख' बनवतात. याच्या औषधाने व्रण बरे होतात. पोटाच्या विकारांवर पिंपळाची फळे औषध म्हणून वापरतात. पिंपळाच्या सालींचा काढादेखील करतात. एखाद्या पुराणपुरुषासमान भासणाऱ्या या विशाल वृक्षाच्या खाली बसून गौतम बुद्धांनी बोधगया येथे ज्ञानप्राप्ती करून घेतली होती, तेव्हापासून त्याला 'बोधीवृक्ष' असेही म्हणतात. कवी दासू वर्णन करतात,
जगण्यामधल्या अर्थासंगे, बहकून गेले अक्षर रान,
वाऱ्यावरती थिरकत आले, झाडावरूनी पिंपळ पान।
ब्रह्मांड पुराणात तर वर्णन केले आहे, की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू, तर टोकाला महादेव वास करतात. म्हणून आध्यात्मिक दृष्ट्यादेखील या वृक्षाला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच पिंपळाचे खोड सरपणासाठी वापरत नाहीत. श्रावणी शनिवारी पिंपळाच्या खाली असलेल्या हनुमंताची विशेष पूजा केली जाते. पिंपळपारावर शिवलिंग असल्यास जलाभिषेक केला जातो.
एवढे सगळे वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल, की हा बहुगुणी पिंपळ भयकथांचा भाग कसा झाला. तर, त्याचे शास्त्रीय कारण असे, की सगळे वृक्ष दिवसा, वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने झाडासाठी पोषक अन्न तयार करतात आणि मोबदल्यात प्राणवायू सोडतात. मात्र, रात्री सूर्यकिरणांच्या अभावी त्यांच्या कार्यात अडथळा येतो आणि त्यांच्यावाटे कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो. तो वायू मानवी शरीरास अपायकारक असतो. म्हणून रात्रीच्या वेळी झाडांजवळ जाऊ नये, अशी घरच्या मोठ्यांकडून वारंवार सूचना मिळते.
हा नियम सर्व झाडांना लागू होत असला, तरी पिंपळाच्या झाडावरच संक्रांत का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो, बरोबर ना? तर त्याचेही उत्तर असे, की दिवसा चैतन्यमयी वाटणारा पिंपळ, रात्रीच्या अंधारात अजस्त्र राक्षसासारखा भासतो. त्याच्या पानांची सळसळ होत असताना, ती एकावर एक आपटून पावलांचा आवाज येतो. आधीच सशासारखे आपले भित्रे मन, अशा आवाजाने आणखी दडपले जाऊ नये, म्हणून आपल्या आजी-आजोबांनी पिंपळपारावर मुंजाला आणून बसवले. मुंजा म्हणजे तरी काय, तर रिकामटेकडी माणसं, जी हमखास गावच्या पारावर काथ्याकुट करत बसलेली असतात. अशा लोकांचा संग टाळा, असाही एक त्याचा अर्थ घेता येईल. लहान मुलांना एखादी गोष्ट सांगितली, की ते ऐकत नाहीत. त्यांना भीती घातली, तरच ऐकतात. मुलांच्या मनात भीती बसावी, हा त्यामागे हेतू नसून त्यांच्याप्रती काळजी हीच मुख्य भावना असते. तसेच काहीसे पिंपळपानाबद्दल झाले.
मात्र, बिचारे पिंपळपान, लेखकांच्या तावडीत सापडले आणि त्याच्या पारावर अनेक भयकथांनी जन्म घेतला. त्यातूनच ते समज-गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकले.
हेही वाचा: संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!