'भांsssजे' अशी आरोळी देणाऱ्या शकुनी मामांचे दक्षिणेत मंदिरही आहे; कोणत्या कारणामुळे? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:13 PM2022-02-14T18:13:23+5:302022-02-14T18:13:43+5:30
भारत हा एकमेव देश असेल जिथे रामाची आणि रावणाचीही पूजा करणारे भक्त आहे. तर उपरती झालेल्या आणि शिवकृपेस पात्र ठरलेल्या शकुनी मामाचे मंदिर असू शकेल यात काय ते नवल!!!
भारताच्या विविध भागात शेकडो मंदिरे आहेत ज्यात देवतांची पूजा केली जाते. मात्र, दक्षिण भारतात असे एक मंदिर आहे. जिथे देवतांची नाही तर महाभारत युद्ध घडवणाऱ्या दुर्योधनाचा मामा शकुनीची पूजा केली जाते. असे म्हणतात की जो कोणी त्याची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला, जाणून घेऊया या मंदिराचे महत्त्व आणि मंदिराच्या स्थापनेची कहाणी-
महाभारत युद्ध संपल्यावर दुर्योधनाचा मामा शकुनी याने महाभारतात लाखो जीवांच्या मृत्यूचे कारण आपण बनलो या पश्चात बुद्धीने प्रायश्चित्त केले, असे म्हणतात. यामुळे लाखो लोक मारले गेलेच, पण साम्राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. या पश्चातापाने शकुनी अतिशय हताश झाले व त्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संन्यासी जीवन अंगीकारले. नंतर, मामा शकुनीने केरळ राज्यातील कोल्लम येथे भगवान शिवाची मन एकाग्र करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. यानंतर भगवान शंकरांनी त्यांना दर्शन देऊन त्यांना पापमुक्त केले असे म्हणतात.
मामा शकुनीने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, त्या ठिकाणी सध्या हे मंदिर आहे, ज्याला मायामकोट्टू मलंचरुवू मलानाद मंदिर म्हणतात. ज्या दगडावर बसून त्यांनी शिवाची तपश्चर्या केली. त्या दगडाची पूजा केली जाते. सध्या या जागेला पवित्रस्वरम म्हणतात.
या मंदिरात मामा शकुनीशिवाय देवी माता, किरातमूर्ती आणि नागराज यांची पूजा केली जाते. या ठिकाणी वार्षिक मलक्कुडा महालसवम उत्सव आयोजित केला जातो, ज्याला हजारो लोक उपस्थित असतात. यावेळी मामा शकुनीची पूजा केली जाते. एकदा कौरव पांडवांच्या शोधात या ठिकाणी पोहोचले होते असेही म्हणतात. त्यावेळी त्यांनी शकुनी मामाला कोल्लमबद्दल सांगितले होते. अशीही कथा आहे.
भारत हा एकमेव देश असेल जिथे रामाची आणि रावणाचीही पूजा करणारे भक्त आहे. त्याचबरोबर हे दोघेही अस्तित्त्वातच नव्हते किंवा रामायण घडलेच नाही असेही म्हणणारा एक गट आहेच. तरीदेखील दोघांचे उत्सव होतात. तर उपरती झालेल्या आणि शिवकृपेस पात्र ठरलेल्या शकुनी मामाचे मंदिर असू शकेल यात काय ते नवल!!!