'प्रेशर' आणि 'डिप्रेशन' या पाश्चिमात्य शब्दांना भारतीय संस्कृतीत स्थान देण्याचं कारण नाही! - कपिल देव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:50 AM2022-10-11T11:50:40+5:302022-10-11T11:51:49+5:30
तरुणांमध्ये वाढत असलेल्या तणावाचे कारण आणि आजवर आपण कमावलेल्या यशाचे गुपित सांगत आहेत सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव.
अलीकडेच क्रीडाविश्वात झालेल्या एका कार्यक्रमात कपिल देव यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवघ्या एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये त्यांनी तरुण पिढीची कानउघडणी तर केली आहेच शिवाय त्यांच्या यशाचं गुपीतही सांगितले आहे.
ते म्हणतात, 'हल्ली आयपीएल मॅच खेळणारे खेळाडू सतत तणावाखाली असतात. आमच्यावर खूप प्रेशर आहे असे म्हणतात. यावर उपाय काय असे मला विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो, 'नका खेळू!' कारण, तणाव घेऊन केली जाणारी गोष्ट कधीच यशस्वी होत नसते. आम्ही सुद्धा कित्येक मॅच खेळल्या, पण कधी तणाव घेऊन खेळल्याचे आठवत नाही. कारण आम्ही खेळायचो ते आनंदासाठी. त्यातही प्रतिपक्षाशी स्पर्धा होती, चढाओढ होती, पण तणावाचे वातावरण अजिबात नव्हते. प्रयत्नांची शर्थ करून खेळणे एवढेच आमचे कर्तव्य होते व ते आम्ही चोखपणे बजावत असू.
याउलट आताची शाळकरी, महाविद्यालयीन मुलंसुद्धा म्हणतात, आम्हाला टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, प्रेशर येतं...! वातानुकूलित वर्गात बसून, शिक्षकांचा मार न खाताही मुलं या गोष्टींना सामोरे जातात, हे ऐकून मला प्रश्न पडतो, यांचे आई वडील कमावतात, ते यांची फी भरतात, यांना हवं नको ते सगळं पुरवतात, मग फक्त अभ्यासाची जबाबदारी मुलांवर असताना त्यांना प्रेशर घेण्याचे कारण काय हेच कळत नाही. हे पाश्चिमात्य शब्द आपले नाहीच, कधी नव्हतेच!
मी स्वतः शेतकरी आहे आणि मी क्रिकेट खेळलो ते माझ्या आनंदासाठी. जोवर तुम्ही तुमचा आनंद शोधत नाही, तोवर हे भयावह शब्द तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. जे काम कराल ते आनंदाने करा. हे शब्द आपले नाहीत, ते विसरून जा. कामाप्रती असलेले समर्पण तुम्हाला निराश होण्याची संधी देणार नाही. अपयश आले तरी आपण पूर्ण प्रयत्न केले असल्याचे समाधान तुम्हाला नवीन यश संपादन करण्याची प्रेरणा देत राहील.
आनंद शोधण्याचे अनेक क्षण आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले आहेत. इथला प्रत्येक दिवस उत्सवाचे रूप घेऊन येतो. तसे असताना दुःखी, कष्टी राहून कुढत आयुष्य जगण्यापेक्षा प्रयत्नांचे पंख लावा आणि आत्मानंद घ्या, असे सांगण्यावर कपिल देव यांचा भर दिसून येतो. हेच सूत्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनुसरले आणि ते यशस्वी झाले. त्यांचा आदर्श बाळगून आपल्यालाही मार्गक्रमणा करायला हवी. बरोबर ना?