यशाचा मंत्र असतो का? असल्यास कोणता? या गोष्टीतून जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:00 AM2021-08-11T08:00:00+5:302021-08-11T08:00:02+5:30

माणसाने शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच राहावे असे म्हणतात. परंतु आपण 'पी हळद नि हो गोरी' या वाकप्रचारानुसार थोडेसे शिकलो तरी ...

Is there a mantra of success? If so, which one? Learn from this story! | यशाचा मंत्र असतो का? असल्यास कोणता? या गोष्टीतून जाणून घ्या!

यशाचा मंत्र असतो का? असल्यास कोणता? या गोष्टीतून जाणून घ्या!

googlenewsNext

माणसाने शेवटपर्यंत विद्यार्थी दशेतच राहावे असे म्हणतात. परंतु आपण 'पी हळद नि हो गोरी' या वाकप्रचारानुसार थोडेसे शिकलो तरी स्वत:ला सर्वज्ञ समजू लागतो. याबाबतीत एक गोष्ट आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकेल. 

एक चित्रकार आपल्या वडिलांकडून आलेला चित्रकलेचा व्यवसाय जोपासत त्यावर गुजराण करत होता. त्याला एक मुलगा होता. चित्रकार वृद्धापकाळाकडे झुकू लागला. तसा त्याचा हात थरथरू लागला. त्याला वाटले, की आता आपण आपल्या मुलाला या व्यवसायात उतरवले पाहिजे. वारशाने मुलाच्या अंगी देखील चित्रकलेचे गुण उतरले होते. त्याने वडिलांचा शब्द पाळला आणि सुंदर चित्र काढून त्यांना दाखवले. वडील म्हणाले, आता हे चित्र तू बाजारात नेऊन विक.

मुलगा बाजारात गेला आणि चित्र विकून आला. त्याला चित्राचे २०० रुपये मिळाले. तो नाराज झाला. म्हणाला, `बाबा तुमच्यासारखे चित्र काढूनही तुम्हाला ५०० आणि मला २०० च रुपये का मिळाले. तुम्ही मला यशाची गुरुकिल्ली दिली नाही का?'
वडिल म्हणाले, 'बेटा आणखी थोडे प्रयत्न कर.'

मुलगा चित्र काढत होता, विकत होता पण ३०० ते ४०० रुपयांच्या वर त्याची मजल जात नव्हती. तो वडिलांवर रागावला. वडिल म्हणाले, 'तुझ्या कामात कमतरता कुठे राहतेय याचा नीट अभ्यास कर मग मी तुला यशाचा मंत्र देईन.'

मुलाने ठरवले, आज काहीही झाले तरी चित्र ५०० रुपयांना विकून दाखवायचे. तो ठरवून बाजारात गेला आणि काय आश्चर्य, त्या दिवशी त्याला चित्राचे ७०० रुपये मिळाले. तो आनंदाने परत आला आणि त्याने वडिलांना पैसे दाखवले. वडिलांनी त्याचे अभिनंदन करत सांगितले, 'आता मी तुला यशाचा मंत्र देतो.'
मुलगा म्हणाला, `आता मला त्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमची चित्रे ५०० रुपयात विकत होतात, मी ७०० रुपयात ते विकून दाखवले आहे. मी जिंकलो आहे.'

हे ऐकून वडील म्हणाले, `बेटा याच वळणावर तुला त्या मंत्राची गरज लागणार आहे. कारण अनेक वर्षांपूर्वी मी सुद्धा हीच चूक केली होती. मी माझ्या वडिलांपेक्षा ३०० रुपयाचे चित्र ५०० रुपयांत विकून दाखवले होते. तेव्हा त्यांनी मला यशाचा मंत्र देणार, तोच मी त्यांना तुझ्यासारखाच मिजास दाखवला होता. ती चूक मला आतापर्यंत भोवतेय. आजोबांचे मी ऐकले असते, तर मला नवीन काही शिकता आले असते. मात्र माझ्या अहंकारात मी शिकण्याची प्रक्रिया थांबवली आणि आयुष्यभर मी ५०० रुपयांवर समाधान मानत राहिला़े तेच मी वडिलांचे ऐकले असते, तर कदाचित माझे उत्पन्न प्रत्येक चित्रामागे १००० रुपये असते. म्हणून तुझा प्रवास ७०० रुपयांवर थांबू नये असे वाटत असेल, तर एकच मंत्र लक्षात ठेव, तो म्हणजे `शिकणे थांबवू नकोस!' ज्याने शिकण्याची प्रक्रिया थांबवली त्याने ज्ञानाची कवाडे बंद केली असे समजावे.'
 
म्हणून आपणही हा यशाचा मूलभूत मंत्र लक्षात ठेवून जे जे काही चांगले शिकायला मिळेल ते सातत्याने शिकत राहिले पाहिजे. तरच आपली प्रगती होत राहिल अन्यथा जेवढे आहे त्यात समाधान मानून विकासाची दारे बंद करावी लागतील. 

Web Title: Is there a mantra of success? If so, which one? Learn from this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.