पर्यावरण नावाची अशी कोणती वेगळी वस्तू नाही!
By विजय दर्डा | Published: September 7, 2020 09:12 AM2020-09-07T09:12:12+5:302020-09-07T09:17:29+5:30
ज्या मातीवरून आपण चालतो, तिच्यापासून हे शरीर बनले आहे. हे आकळले, तर आणि तरच जीवन आमूलाग्र बदलेल. नाही तर मृत्यूनंतर मातीत मिसळण्याची वेळ येईल, तेव्हाच कळेल की आपणही खरे म्हणजे या मातीचाच एक हिस्सा आहोत!, सदगुरू जग्गी वासुदेव यांच्याशी विजय दर्डा यांनी केलेला मनमुक्त संवाद
प्रत्येक प्रश्नाचा विचार बुद्धीने करावा, तोच जगण्याचा एकमेव मार्ग आहे, असे आपण समजतो. याचे कारण पश्चिमी विचारावर बेतलेले आपले शिक्षण! सगळीकडे बुद्धी चालवायची, त्यामुळे सुरीने सतत कापत राहायचे. सगळ्याचे तुकडेतुकडे करायचे. प्रत्यक्षात आयुष्य असे तुकड्यात कापता येत नाही. मी वेगळा, पर्यावरण वेगळे असे काही नसते. ज्या मातीवरून आपण चालतो, तिच्यापासून हे शरीर बनले आहे. हे आकळले, तर आणि तरच जीवन आमूलाग्र बदलेल. नाही तर मृत्यूनंतर मातीत मिसळण्याची वेळ येईल, तेव्हाच कळेल की आपणही खरे म्हणजे या मातीचाच एक हिस्सा आहोत!
विजय दर्डा : सद्गुरु, आज तुमच्याशी या पृथ्वीवरील जीवसृष्टीविषयी संवाद करावा, असे मनात आहे. मनुष्याने निसर्गाचे एवढे नुकसान केले आहे की, त्याची भरपाई करणे अशक्य आहे. झाडे तोडली, जंगल उद्ध्वस्त केले. डोंगर पोखरले गेले. नद्यांचे मार्गदेखील आपण बदलवून टाकले आहेत. कितीतरी नद्या तर लुप्त झाल्या आहेत! आणि आता आपल्यासमोर हे विषाणूच्या महामारीचे संकट उभे ठाकलेले आहे. १८ वर्षांच्या माझ्या संसदीय कारकिर्दीत मी या मुद्यांविषयी, पर्यावरणविषयक प्रश्नांविषयी राज्यसभेत सातत्याने लक्ष वेधत आलो. पर्यावरण समितीत कार्य करताना धोरण निश्चितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लोकमतसारख्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहाचा अध्यक्ष या नात्याने जनजागृतीसाठी मी पर्यावरणाविषयी नियमित लेखन करीत आलो. जनहिताच्या मुद्यांना पाठिंबा देण्याचा वारसा मला माझे वडील स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्याकडून मिळाला. मी जैन धर्माचा अनुयायी आहे आणि पर्यावरण विषयीच्या चर्चेत भगवान महावीर हे अग्रणी होते. पर्यावरण संरक्षणाची गरज हीच जैन धर्माची शिकवण आहे. जैन धर्मात एक फुल तोडण्यास मनाई आहे, मुंगी मारणे सुध्दा मोठे पाप मानले जाते. सर्वच धर्म पर्यावरणाचा आदर करतात, पण आज मात्र धर्माच्या नावावर जगभर हिंसा सुरू आहे. सद्गुरु, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, आणि तुम्ही शंकासमाधान कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे. आपण एक आध्यात्मिक गुरु आहात, आणि पर्यावरणाचे प्रश्न सातत्याने मांडत असता. पर्यावरण आणि आध्यात्मिकता यांचा सहप्रवास होऊ शकतो का ?
सद्गुरु : (स्मित करीत) पर्यावरण ही काही वेगळी, स्वतंत्र अशी वस्तू नव्हे! आयुष्यापासून ‘पर्यावरण’ वेगळे कसे काढता येईल? आपण हे असे करतो, कारण आपल्या शिक्षणाने आपल्याला हा असा तुकड्यातुकड्यात विचार करायला शिकवले आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि शिक्षण हे बुध्दिप्रामाण्यवादी आहे. माणसाची बुध्दी कशी असली पाहिजे, असा प्रश्न समजा मी तुम्हाला विचारला, तर तुम्ही काय उत्तर द्याल?
दर्डा : सद्गुरु, काळाच्या ओघात माणसाने निसर्गाबरोबर संघर्ष आरंभला. आता या कोविडच्या जागतिक महामारीने माणसाला निसर्गासोबत अधिक नम्रतेने, सहानुभावाने जगण्याचा धडा दिला आहे. हा धडा माणसाच्या पुढच्या वाटचालीसाठी किती उपयोगी पडेल असे तुम्हाला वाटते?
सद्गुरु : हे पहा, या पृथ्वीवर एकच समस्या आहे, आणि ती म्हणजे मनुष्य. विषाणू ही समस्या नव्हे, माणूस ही खरी समस्या!! माणसाने प्रगतीचे डंके बडवले, विकासाचे शिखर गाठले, बुध्दिमत्ता आणि क्षमतांच्या सर्वोच्च उंचीवर जाण्याची ईष्या धरली! आता हेच सगळे माणसाच्या सुखा-समाधानाच्या, समृध्दीच्या आड आले आहे. त्याचे आयुष्य तणावाने भरले आहे. तणाव, दबाव, दु:ख, नैराश्य...तुम्ही जे नाव द्याल ते. हे मनुष्याच्या त्रासाचे विविध स्तर आहेत. आजार, दुखापत, रोगराईने शारीरिक त्रास झाला तर वेगळी गोष्ट. पण माणसाचा ९५ टक्के त्रास हा मानसिक असतो. मानसिक त्रास म्हणजे स्वत: निर्माण केलेली समस्या. याचा अर्थ आपल्याजवळ धारदार सुरी आहे आणि ती कशी पकडावी हे आपल्याला समजत नाही. प्रत्येकवेळी आपलीच सुरी वापरून आपण स्वत:लाच दुखापत करुन घेतो. नुसते बसल्याजागी तुम्ही दु:खी आहात, याचा अर्थ तुमची बुध्दी तुमच्या दु:खाचे कारण आहे. मी तुमचा अर्धा मेंदू काढून घेतला तरच कदाचित तुम्ही शांतचित्त व्हाल. मनशांती हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे, असे बहुसंख्य आध्यात्मिक गुरु सांगत फिरत असतात. स्वास्थ्य ही मौलिक गोष्ट आहे. साधा अन्नाचा आनंद घ्यायचा असला, तरीही तुम्ही आधी शांतचित्त व्हायला हवे. शांती आयुष्याच्या अखेरीला नव्हे, आज आत्ता जगताना तुमच्या मनात असायला हवी! अ हे अक्षर वर्णमालेत शेवटी कसे असेल? त्याने तर सुरुवात व्हायला हवी ना? शांतता, स्वास्थ्य हे आज..आत्ता हवे! रस्त्यावर भटकणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे या साध्या साध्या गोष्टीतील आनंद एरवी तुम्ही कसा शोधाल? आपले शरीर, आपले मन, आपली बुध्दी, आपल्या भावना यांना कसे सांभाळावे हे कुणीच कुणाला कधीच शिकवत नाही. आपण सगळे जग जिंकण्याचा ध्यास घेतला आहे, आपल्याला चंद्रावर जायचे आहे, दुसऱ्या ग्रहांवरही जायचे आहे; पण आपण आत्ता जिथे आहोत, ज्या ग्रहावर आहोत, तिथे आपले काय चालले आहे याचा जरा विचार करायला मात्र आपली तयारी नाही. याचे कारण? - ‘जिंकणे’ हेच आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट होऊन बसले आहे. गेल्या ६०-७० वर्षांत पृथ्वीतलावरील सूक्ष्म जीवांच्या एकूण संख्येपैकी ८० टक्के नामशेष झाले आहेत. या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवरील ५० टक्के प्रजाती लुप्त होण्याचे संकट असल्याची भीती व्यक्त केली आहे. माणसाला या कशाशीच काही देणेघेणे असू नये का? या पृथ्वीवर सूक्ष्म जीवाणूंपासून किडे-मुंग्या, कावळे-चिमण्या, पशु-पक्षी, वृक्षवेली हे सगळे आहेत म्हणूनच माणूसही इथे जिवंत आहे हे समजून घेणेही आपण विसरून गेलो आहोत.
दर्डा : सद्गुरु, आपण दोन मुद्दे येथे उपस्थित केले आहेत. एक शांतता-मनस्वास्थ्य आणि दुसरे शिक्षण. मनस्वास्थ्य कसे आणि कुठे मिळेल? ते निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची आहे?
सद्गुरु : मनुष्य आपल्या बुध्दीला सांभाळू शकत नाही, त्यामुळे तो स्वत:च स्वत:च्या मनावरचा दबाव आणि तणावाचे कारण बनत आहे. जर तुम्हाला तुमच्या मनाचा उपयोग करण्याची कला माहीत असेल तर तुम्ही स्वत:साठी आनंद निर्माण करता की दु:ख? समजा तुमची दोन बोटे सारखी तुमच्याच डोळ्यात जातात, याचा अर्थ आपल्या हातांचा उपयोग करणेच तुम्हाला आम्हाला माहीत नाही, खरे की नाही? माणसाला आपल्या बुध्दीचा नीट उपयोग करता येत नाही. माणसाची विकसित बुध्दी हीच समस्या बनली आहे.
दर्डा : बुद्धी हा उपाय असायला हवा; पण तीच समस्या बनली आहे. मग यावर उपाय काय?
सद्गुरू : याचे मुख्य कारण आहे सतत जिंकण्याची विचित्र सक्ती! माणसाला सतत फक्त जिंकायचे असते. जिंकण्यासाठीच सगळा झगडा! आपले शिक्षणही जिंकण्यासाठीच! अगदी बालवाडीतील मुलावरही वर्गात पहिले येऊन जिंकण्याची सक्ती! आता, हे असेच होणार असेल तर माणसाच्या वाट्याला दु:खच येणार!
दर्डा : सगळ्यांच्या पुढे जा आणि अव्वल स्थानी राहा, हीच शिकवण आहे सर्वत्र. ध्यास मार्कांचा आहे, व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक मूल्यांचा नाही!
सद्गुरू : सगळ्यात मूल्यांचा आग्रह फार पुढचा विजयजी, मी तर म्हणतो, की एक मनुष्य म्हणून तुम्हाला हातपाय, मेंदू लाभला आहे; यांचा उपयोग आपल्या भल्यासाठी कसा करावा, हे तरी तुम्हाला माहीत हवे की नको? जर तुमचा हात तुमच्याच चेहऱ्यावर प्रहार करायला लागला, तुमचाच मेंदू तुमचेच मन कुरतडत राहिला तर तुमच्या वाट्याला स्वास्थ्य येणार कसे? खरा प्रश्न तुमच्या आयुष्यातील तणावाचा नाही, तो तणाव जिथून उत्पन्न होतो त्या तुमच्या मेंदूचा आहे!
दर्डा : सद्गुरू, आज आपल्या देशाची लोकसंख्या एवढी झाली आहे, की जवळपास ८० टक्के लोकांना दोन वेळचे भोजनही पुरेसे मिळत नाही...?
सद्गुरू : तो एक क्लिष्ट प्रश्न आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण ३३ कोटी होतो. आज १२५ कोटी आहोत. अवघ्या ७४ वर्षांत आपण चौपट कसे झालो? सरासरी आयुर्मान वाढले आहे, ती चांगली गोष्ट आहे. १९४७ मध्ये सरासरी आयुर्मान अवघे २८ वर्षे होते. आज ते ७२-७३ वर पोचले आहे, हे देशासाठी अभिमानास्पद! पण मला एक सांगा, जर आपण मृत्यू टाळू लागलो, तर मग जन्मही टाळावा का? - साधे गणित घालून पहा!!
दर्डा : आज संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अतोनात वाढत आहे. हे थांबविण्यासाठी महाराष्ट्र काय करू शकतो?
सद्गुरू : विदर्भात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते, कारण तो बेसॉल्ट खडकाचा पट्टा आहे. जमिनीची रचनाच अशी आहे, की काही विशिष्ट प्रकारची झाडेच तिथे चांगली रुजतात आणि वाढतात. वर्षानुवर्षे केवळ एकच पीक घेण्यासारखी ती जमीन नाही, मात्र दुर्दैवाने आपण नेमके तेच करीत आहोत. त्या भागातील शेतकरी दु:खी आहे; कारण तो शेतीला पैसा लावतो आणि मनासारखे पीक होत नाही. तरीही तो वर्षानुवर्षे पैसा लावतच राहतो. शेवटी तो एवढा हताश होतो, की त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच दिसत नाही. दुर्दैवाने आज यवतमाळ जिल्हा देशातील शेतकरी- आत्महत्यांचे प्रमुख केंद्र बनला आहे. हे चित्र बदलले पाहिजे, असे मला वाटले, म्हणून आम्ही तिथे काम सुरू केले आहे. उत्तम प्रयत्न केले तर त्या भागातील चित्र बदलता येईल. सध्या आमचे स्वयंसेवक फोनवर प्रत्येक परिवाराच्या संपर्कात आहेत. कोणतीही समस्या उद्भवल्यास शेतकरी आमच्या स्वयंसेवकांशी बोलू शकतात. भले आम्ही त्यांना आर्थिक मदत देऊ शकणार नाही; परंतु किमान एक भावनात्मक ताकद आणि प्रेरणा नक्कीच देऊ शकतो, जेणेकरून ते पराभूत मानसिकतेत जाणार नाहीत.
दर्डा : पाऊस-पाणी ही इकडल्या लोकांची मुख्य समस्या आहे.
सद्गुरू : नाही. मूळ समस्या जमिनीच्या गुणवत्तेची आहे. लोक बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या जमिनीत शेती का करतात?- कारण लोकसंख्येचा रेटाच तसा आहे. खाणारी तोंडे वाढत असतील, तर लोकांना नापिक जमीनही कसण्याचा प्रयत्न करावाच लागतो. त्यातून मग स्वाभाविकरीत्या हताशाच पदरी पडते. लोक शेतीत पैसा गुंतवतात; पण त्यांच्यासाठी कोणतीही विशेष योजना नाही. ते बँकेतून कर्ज घेतात आणि मनाजोगे पीक न झाल्याने बँकेचे कर्ज फेडू शकत नाहीत. मग अडचणीत सापडले, की सावकाराच्या दारात पोहचतात. त्यामुळे अडचणी आणखी वाढतात. लोक म्हणतात सावकारी ही एक समस्या आहे. साफ चूक! तो एक परिणाम आहे. जमीन सुपीक नाही, ही खरी समस्या आहे. जमीन सुपीक बनवायची असेल, तर ओलावा हवा, हिरवळ हवी. जमीन सुपीक बनविण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. झाडांचा पालापाचोळा आणि पशुंपासून मिळणारे शेणखत हे जमिनीचे अन्न आहे! आधी आपण झाडे तोडली आणि सारे पशुधन आता मांसासाठी विदेशात जात आहे. नापिक जमिनीतून पीक घेण्याचा प्रयत्न झाला, तर हाती काय लागेल? ही केवळ यवतमाळची कथा नाही. यवतमाळात आज असलेली स्थिती लवकरच देशाच्या अनेक भागांमध्ये बघायला मिळू शकते; कारण भारताची ५२ टक्के जमीन खराब असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दर्डा : आपण या कामासाठी सरकारचे मन वळवले?
सद्गुरू : आता हे अधिकृत सरकारी धोरण आहे. सरकार तयार झाले; कारण लोक तयार झाले होते. मी राबवलेल्या नदी अभियान आंदोलनात तब्बल १६.२ कोटी लोक सहभागी झाले होते. हा प्रचंड जनसहभाग पाहिल्यानंतर केंद्र सरकारने सर्व २८ राज्यांसाठी ती अधिकृत धोरणात्मक शिफारस बनविली. आता काही राज्ये या दिशेने सक्रिय पावले उचलत आहेत. दुर्दैवाने यावर्षी कोरोना विषाणू संकटामुळे कामाची गती मंदावली आहे.
दर्डा : सद्गुरू, याबाबतीत आपण वारंवार कर्नाटक सरकारचा नामोल्लेख करीत असता. महाराष्ट्र सरकार यासंदर्भात काहीही काम करीत नाही, असे आपणास वाटते का?
सद्गुरू : महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. सुमारे ५० कोटी वृक्ष! हे अद्भूत आहे; पण सुमारे ८४ टक्के जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. वृक्ष लागवड शेतकºयासाठी लाभदायक सिद्ध झाली, तरच शेतकरी झाडे लावतील. कृषी उत्पादक कंपन्यांना लागणारा कर रद्द करण्याची गरज होती. सरकारने दोन वर्षांपूर्वी ते चांगले काम केले. त्याशिवाय अनुदान देण्याचीही गरज आहे. मी वारंवार कर्नाटकचा उल्लेख करतो, कारण त्या राज्यानेच सर्वप्रथम चार वर्षांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. आता आम्ही कावेरी खोऱ्यात तब्बल ५२ लाख शेतकऱ्यांना ३० टक्के वृक्षाधारित शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्र सरकारने यवतमाळसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’चे गठन केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात याची चांगली फळे लवकरच दिसू लागतील.
दर्डा : आपण महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला, असे मी ऐकले आहे. त्या पर्वतरांगांमधील आपले सर्वाधिक आवडते स्थळ कोणते? सह्याद्री पर्वतरांगांसोबतच्या आपल्या ॠणानुबंधांसंदर्भात काय सांगाल?
सद्गुरू : (हसत हसत) मी त्या भागात बराच काळ व्यतीत केला आहे. मोटरसायकलने खूप फिरलो आहे. ट्रेकिंगही केले आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कर्नाटक भागातील जवळपास सर्वच शिखरे मी पादाक्रांत केली आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास मी गोरखनाथ गुहांना अनेकदा भेट दिली आहे. गोव्यापासून कन्याकुमारीपर्यंत मी माझ्या मोटरसायकलवरून फिरलो आहे. तब्बल ११ वेळा गोव्यापासून कन्याकुमारीपर्यंत आणि परत....
दर्डा : महाराष्ट्रातील आपल्या आवडत्या स्थळासाठी काही विशेष योजना?
सद्गुरू : लोणावळ्यानजीक एक केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे; पण लोणावळ्यापासून थोडे दूर. पुण्याच्या दिशेने. अर्थात त्यासाठी जमीन आणि इतर गोष्टींचा योग जुळून येणे गरजेचे आहे.
दर्डा : सद्गुरू, आपल्या या कामात माध्यमे कोणत्या प्रकाराने सहभागी होऊ शकतात?
सद्गुरू : लोकांच्या सहभागाशिवाय असे प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाहीत. एकटे सरकार काही करू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग लागतोच. काही धोरणात्मक बदल होत आहेत. बाजार समिती कायद्यात सूट मिळाल्याने आता शेतकरी आपले उत्पादन हव्या त्या ठिकाणी विकू शकतो. तुम्ही तुमच्या जमिनीत झाड लावले आणि तुम्हाला हव्या त्या वेळी ते तोडले तर तुम्हाला अटक होऊ शकत असे, आता हे बदलले आहे. आता जर तुम्ही तुमच्या जमिनीत झाड लावले तर ते तुम्ही कापू शकता आणि देशभर पाठवू शकता.
दर्डा : सद्गुरू, आपली तरुण मुले मला फार हताश दिसतात. कोविडमुळे बेरोजगारीही वाढली आहे. त्यातून आलेली निराशा हिंसाचाराचे रूप घेते आहे. या अस्वस्थ पिढीला आपण काय सांगाल?
सद्गुरू : मी आणि माझे ही वृत्ती आपण पश्चिमेकडून घेतली. भारतीय संस्कृतीत ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’ अधिक महत्त्वाचे मूल्य आहे. याचा विसर पडल्याची मोठी किंमत सध्या आपण चुकवत आहोत. मी माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती नव्हे, अखेरची व्यक्ती! नव्या पिढीकडे संवादाचे नवे तंत्र आहे. पण हे तंत्र दुर्दैवाने सकारात्मक मार्गाने वापरले जात नाही. ते तसे वापरले गेले, तर ती एक मोठी शक्ती बनू शकते. यापूर्वी आपण अशाप्रकारे संपूर्ण जगापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. विजयजी, तुम्ही आत्ता नागपुरात बसलेले आहात, मी टेनेसीमध्ये बसलो आहे, परंतु आपण दोघे परस्परांशी बोलू शकतो. हे पूर्वी शक्य होते का? या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचे प्रयत्न झाले नाहीत, तर मात्र हे वरदान हाच एक शाप होऊन बसेल. बुद्धीची धारदार सुरी माणसाच्या काय उपयोगाची?
दर्डा : प्रखर. प्रखर असली पाहिजे बुध्दी!
सद्गुरु : ... हो ना?तर बुध्दी ही एका सुरीसारखी आहे. जितकी धारदार तेवढी चांगली आहे, असे आपण मानतो. पण आपण सुरीने काय करतो? तर आपण फक्त कापू शकतो. सुरी घेऊन आपण फाटलेले जोडू शकत नाही, उसवलेल्याला शिलाई घालू शकत नाही. सुरीने कपडे शिवायचा प्रयत्न केला तर त्याच्या चिंध्या होतील. सध्या जगात नेमके हेच चालू आहे! प्रत्येक प्रश्नाचा विचार बुध्दीने करावा, तोच जगण्याचा एकमेव मार्ग आहे, असे आपण समजतो. याचे कारण पश्चिमी विचारावर बेतलेले आपले शिक्षण! सगळीकडे बुध्दी चालवायची, त्यामुळे सुरीने सतत कापत राहायचे. सगळ्याचे तुकडे तुकडे करायचे. प्रत्यक्षात आयुष्य असे तुकड्यात कापता येत नाही. मी वेगळा, पर्यावरण वेगळे असे काही नसते. ज्या मातीवरुन आपण चालतो, तिच्यापासून हे शरीर बनले आहे. हे आकळले, तर आणि तरच जीवन आमुलाग्र बदलेल. नाहीतर मृत्यूनंतर मातीत मिसळण्याची वेळ येईल, तेव्हाच कळेल की आपणही खरे म्हणजे या मातीचाच एक हिस्सा आहोत! हेच आपले जीवन आहे आणि जीवनाचा हाच स्त्रोत आहे. जीवन ही परस्परांशी ताळमेळ राखून असलेली एक एकसंघ गोष्ट आहे, तुकड्यात तुकड्यात विभागलेली वस्तू नव्हे. आज अवघे जग एका विषाणूपुढे हतबल आहे खरे, पण आपल्या शरिराचा ५२ टक्कयांहून अधिक भाग हा सूक्ष्म जीवाणूंनी बनला आहे.. मग मला सांगा, मी या पर्यावरणापासून वेगळा कसा? मीच पर्यावरण आहे, पर्यावरण हाच मी आहे... आम्हा दोघांमध्ये काहीही फरक नाही. पुढील ३० वर्षांत भारताची सुमारे ५२ टक्के जमीन वाळवंट बनू शकेल
दर्डा : शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झाडे अथवा बांबूची लागवड करावी असे आपण सुचवता आहात का?
सद्गुरु: झाडे लावून शेतकरी मधल्या जागेत आंतरपीक घेऊ शकतात. पिकांना सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यावेळी झाडांच्या फांद्या छाटून टाकता. तुम्ही झाड जितके छाटता, तितकी त्याची उंची वाढते. कारण ही झाडांची प्रवृत्ती आहे. देशात ६३ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या लाकडांची आयात होत आहे. देशात मग शेतकऱ्याला फायदा का होऊ नये? सध्या जर तुम्ही दिल्ली ते चेन्नई दरम्यान विमानाने जात असाल आणि दर पाच मिनिटांनी खाली पाहा : पश्चिम घाट वगळता सर्वत्र राखाडी वाळवंट दिसेल! कुठेही झाड नाही. आपल्या देशात पावसाळा हाच एकमेव पाण्याचा स्रोत आहे. मान्सूनचा पाऊस हा पाण्याचे एकमेव स्त्रोत आहे. नद्या पाण्याचे स्त्रोत नाहीत. ओढे, तलाव आणि विहिरी हे पाण्याचे स्त्रोत नाहीत. पावसाचे पाणी फक्त तिथे गोळा होते. मान्सूनचा पाऊस पूर्वी ७५ ते १४० दिवस असायचा. आज ते प्रमाण ४० ते ८० दिवसांवर आलेले आहे.पूर्वी एवढेच पाणी पूर्वीपेक्षा कमी दिवसात खाली येते यामुळे पूर येत आहेत. ज्या ठिकाणी पूर येतो, त्याच्या तीन महिने अगोदर आपणास दुष्काळ पडलेला दिसेल. पाण्याने जमिनीत प्रवेश केला पाहिजे, पण ते ते पृष्ठभागावर वाहत राहाते. तोच पूर! जर पाणी जमिनीत मुरायचे असेल तर सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे जमिनीवर पुरशी हिरवळ किंवा झाडे असली पाहिजेत. अन्यथा पाणी जमिनीत मुरणार नाही. ते पृष्ठभागावर वाहील. यामुळे वाळवंट निर्माण होत आहेत. पुढील ३० वर्षांत भारताची सुमारे ५२ टक्के जमीन वाळवंट बनू शकेल. आपण अशा बेदरकारपणे जगतो आहोत, की आपली पिढी ही जणू शेवटचीच पिढी आहे या पृथ्वीवर! आपण हे बदलले पाहिजे. याच पिढीमध्ये बदलले पाहिजे. तरच दुर्बलांना चिरडण्याच्या मनोवृत्तीला आळा घालता येईल.
दर्डा : आता एक शेवटचा प्रश्न सद्गुरू.. या जगात सगळ्यात जास्त दु:ख स्त्रियांच्या वाट्याला येते. मी इतका प्रवास केला, इतक्या धर्मांचा अभ्यास केला, सर्वत्र स्त्रियांच्या दु:खाच्या खुणा दिसतातच. सद्गुरू, तुम्ही काय सांगाल याबद्दल?
सद्गुरू : तसे आहे खरे. परंतु मूलभूत अर्थाने ही समस्या केवळ स्त्रियांविषयीची नाही. जो आपल्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्याला माणूस चिरडून टाकू इच्छितो, हे खरे मूळ आहे. दुर्दैवाने, स्त्रिया शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत. माणूस स्त्रीशिवाय जन्माला येत नाही. असे असूनही त्या शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत, दुर्दैवाने आम्ही त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो. यापासून सुटका केव्हा मिळेल? - आपल्यापेक्षा दुर्बल असा कुणीही जीव ही चिरडण्याची नव्हे, तर पोषित करण्याची गोष्ट आहे हे प्रत्येक माणसाने मनातून मान्य करणे! त्यासाठी आत्मविकास साधणे! जे जे म्हणून दुर्बल असतील, त्यांना हात देऊन सशक्त बनवण्यासाठी मदत करणे ही प्रत्येकच माणसाची आत्मप्रेरणा बनली पाहिजे. त्यासाठी आवश्यक आहे ती दृष्टी. चेतना! आपले व्यक्तीत्व शारीरिक असले, तरी आपले अस्तित्व हे शरीरापलीकडे असले पाहिजे. याची जाणीव विकसित झाली पाहिजे. असे नवे आत्मभान असलेले, जागरूक, चेतनामय जग घडवण्यासाठी आम्ही एक मोठी जागतिक चळवळ सुरू करीत आहोत. जागतिक लोकसंख्येच्या किमान ६० टक्के लोकांचा समावेश होऊ शकेल, असे हे एक व्यापक आंदोलन असेल. इतक्या मोठ्या संख्येने सामान्य माणसे एकत्र येतील, तेव्हा त्यांच्या म्हणण्याकडे आग्रहाकडे लक्ष देण्यावाचून जगभरातील सरकारांना काही पर्यायच असणार नाही. यातूनच पर्यावरणाच्या रक्षणाची जनभावना विकसित होईल. एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची प्रेरणाच क्षीण हो़ऊ शकेल. हिंसेचे नियंत्रण करण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे ते हिंसेची मूळ प्रवृत्तीच खुडून टाकण्यासाठी प्रयत्न करणे! आत्मप्रेरणेने सबळ असे जग तयार होईल, तेव्हाच हे शक्य होऊ शकेल. धन्यवाद विजय जी.
दर्डा : मनापासून धन्यवाद, सद्गुरू! मी आपला आभारी आहे.आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना आपण नेहमीच आशीर्वाद देता. आपले खूप आभार.
पाहा व्हिडीओ -