अजूनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे; विश्वास नाही? वाचा ही गोष्ट...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 25, 2021 04:47 PM2021-03-25T16:47:45+5:302021-03-25T16:48:18+5:30

आपणही चांगुलपणा आणि माणुसकी दोन्ही जपुया. स्वत: चांगले वागुया आणि इतरांना चांगले वागण्यासाठी प्रोत्साहित करूया.

There is still a balance of goodness in the world; Don't believe? Read this story ... | अजूनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे; विश्वास नाही? वाचा ही गोष्ट...

अजूनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे; विश्वास नाही? वाचा ही गोष्ट...

Next

दरदिवशी येणारे वाईट अनुभव आपला माणुसकीवरचा विश्वास उडवून टाकतात. परंतु, अशाच वेळी नेमके असे काहीसे घडते, की आपणहून मान्य करतो, की जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे. असाच अनुभव आला, एका कॅबचालकाला!

कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या, आवक बंद झाली, उपासमारीची परिस्थिती आली. अशीच वेळ आली एका कॅबचालकावर. दोन वर्षांपूर्वी भाड्याने घेतलेली कॅब त्याच्या रोजीरोटीचे माध्यम होती. परंतु, कोरोनाकाळात सगळे ठप्प झाले, त्यात कॅबचालकाचाही नाईलाज झाला. 

नाईलाजाने त्याला घरी बसण्याची वेळ आली. उत्पन्न बंद झाले, त्यामुळे कुटुंबाचीदेखील उपासमार होऊ लागली. येत्या काही काळात घरात पैसे आले नाहीत, तर जीव द्यायची वेळ येईल, असा टोकाचा विचार कॅबचालक करू लागला. 

एक दिवस सकाळीच त्याला फोन आला. अनोळखी नंबर असल्याने त्याने एक दोनदा कट केला. वारंवार त्याच नंबरवरून फोन येत असल्यामुळे वैतागून त्याने फोन घेतला. पलीकडून आवाज आला, 'तुम्ही मला ओळखत नाही, परंतु आपण एकदा भेटलो आहोत. मला तुमच्या बँक अकाऊंटला थोडी रक्कम ट्रान्सफर करायची आहे. कृपया डिटेल्स कळवा.'

बँक डिटेल्स कोणाला देऊ नये, अशी बँकेकडून नेहमी सूचना येते, असे असताना मी अनोळखी व्यक्तीला डिटेल्स का बरे देऊ? अशा विचाराने त्याने फोन कट केला. समोरच्या व्यक्तीने आपले एसएमएस करून त्यावर डिटेल्स पाठवण्याची पुन्हा विनंती केली. 

कॅबचालकाने विचार केला, तसेची माझ्या खात्यात रक्कम नाही. मला कोण लुटणार आहे? तसेही मी अकाऊंट डिटेल्स देणार आहे, पासवर्ड नाही! तो माझे काहीच बिघडवू शकत नाही.

असे म्हणून कॅबचालकाने अकाऊंट डिटेल्स त्या व्यक्तीला पाठवून दिले. पुढच्या पाच मिनीटांत कॅबचालकाला बँकेचा मेसेज आला, `तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले आहेत!' 

कॅबचालकाने त्या व्यक्तीला फोन केला आणि एवढे पैसे त्याने आपल्याला का दिले याबद्दल विचारणा केली, तेव्हा पलीकडून उत्तर आले, `सर, तुमच्यासारखे प्रामाणिक लोक या जगात फार कमी होत चालले आहेत. तीन महिन्यांपूर्वी तुमच्या कॅबने मी इंटरव्ह्यूसाठी जात होतो. घाईत मी माझे पाकीट, फोन कॅबमध्ये विसरलो. ते लक्षात येईपर्यंत तुम्ही निघून गेलात. मी मनातल्या मनात तुम्हाला खूप वाईट बोललो. कशीबशी मुलाखत पार पाडली आणि घरी गेलो, तर तिथे तुम्ही माझा पत्ता शोधून पैसे आणि फोन परत दिले होते. त्याच फोनवर सायकांळी मला नोकरीत निवड झाल्याचा फोन आला. तेव्हा मी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवला होता. 

नोकरीत रुजू होऊन मला दोन महिने झाले. लाखभर पगार मी घेतोय. लॉकडाऊन काळात अचानक तुमची आठवण आली. माझे काम घरून सुरू असले, तरी तुमच्या कामावर गदा आली असणार हा विचार मनात डोकावला. म्हणून माझ्या पगाराचा दशांश तुम्हाला भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. तुमच्यासारख्या लोकांमुळे जगात आजही माणुसकी शिल्लक आहे. धन्यवाद.'

कॅबचालकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, 'तुमच्या सारख्या लोकांमुळे जगात चांगुलपणा शिल्लक आहे...!'

म्हणून आपणही चांगुलपणा आणि माणुसकी दोन्ही जपुया. स्वत: चांगले वागुया आणि इतरांना चांगले वागण्यासाठी प्रोत्साहित करूया.

Web Title: There is still a balance of goodness in the world; Don't believe? Read this story ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.