म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृत कार्य होईजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:23 IST2020-09-08T12:07:51+5:302020-09-08T12:23:09+5:30
गुरु करा, गुरु करा असं नेहमी म्हटलं जातं किंवा असं आपल्या नेहमी ऐकण्यात येतं, तर हे गुरु करा म्हणजे नक्की काय बरं.?

म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृत कार्य होईजे
- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
निर्गुण, निराकार परमेश्वराचा सगुण, साकार आविष्कार म्हणजेच सद्गुरु..! भगवान श्रीसूर्यनारायण उदयाचळी येताच ज्याप्रमाणे सगळ्या जगाचा अंध:कार नष्ट होतो त्याप्रमाणे सद्गुरुरुपी सूर्याचा उदय होताच आमच्यासारख्या बद्ध जीवांचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो..!
गुरु करा, गुरु करा असं नेहमी म्हटलं जातं किंवा असं आपल्या नेहमी ऐकण्यात येतं, तर हे गुरु करा म्हणजे नक्की काय बरं.? तर गुरु करा म्हणजे लघु व्हा. कोणासमोर का असेना नम्र व्हा. गुरुकृपा तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा गुरु आणि शिष्यामध्ये नव्वद अंशाचा काटकोन निर्माण होईल. म्हणजे काय.? तर गुरु आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत आणि शिष्य गुरूंच्या चरणकमलांवर नतमस्तक झालेला आहे. म्हणजेच शिष्याने गुरुसमोर संपूर्ण शरणागती पत्करलेली असेल त्याचवेळी गुरुकृपा होईल.
सद्गुरूंना जगातील कुठलीही उपमा देता येणार नाही. परिसाची उपमा दिली असती पण तीदेखील अपुरी आहे कारण परीस लोखंडाला सोन्यात रूपांतरित करतो हे खरं आहे पण तो त्या लोखंडाला परिस बनवत नाही म्हणजे आपले परिसत्व तो लोखंडाला देत नाही पण सद्गुरु मात्र कसे असतात..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -
आपणांसारिखे करिती तात्काळ, नाही काळ वेळ तयालागी
शिष्य किंवा साधक जर जिज्ञासू असेल, तर जे सद्गुरु असतात ते त्या शिष्याला किंवा साधकाला सद्गुरूच करून टाकतात. म्हणजे आपले स्वत्व ते त्या शिष्याला किंवा साधकाला देऊन टाकतात. जेणेकरून तो शिष्य किंवा साधक पुढे चालून जगाचं गुरुपद भूषवू शकेल. अशी सद्गुरु आणि जिज्ञासू शिष्य किंवा साधकांची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत, जसं की -
निवृत्तीनाथ सद्गुरु - ज्ञानेश्वर महाराज जिज्ञासू साधक
राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदास स्वामी सद्गुरु - कल्याण स्वामी जिज्ञासू साधक
स्वामी रामकृष्ण परमहंस सद्गुरु - स्वामी विवेकानंद जिज्ञासू साधक
काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे
सद्गुरूंची जीवनयात्रा कशी असते.? याचं अतिशय बहारदार वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेले आहे -
का जगाचे आंध्य फेडितू, श्रियेची राऊळे उघडीतू
निघे जैसा भास्वतू, प्रदक्षिणे
भगवान श्रीसूर्यनारायण उदयाचळी येताच ज्याप्रमाणे सगळ्या जगाचा अंध:कार नष्ट होतो त्याप्रमाणे सद्गुरुरुपी सूर्याचा उदय होताच आमच्यासारख्या बद्ध जीवांचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो..! म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात -
धरावे ते पाय आधी आधी
गुरु ही व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे. गुरु हे एक प्रकारचे तत्त्व आहे. जो आपणास सद्वस्तू (भगवंत) दाखवतो किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो तो खरा सद्गुरू..!
'ग' व 'र' ही दोन व्यंजने आणि उकार. गुरुगीतेच्या तेविसाव्या श्लोकात गुरुची एक व्याख्या सांगितलेली आहे, ती अशी -
'गु' म्हणजे 'अज्ञान/अंध:कार' आणि 'रु' म्हणजे ज्ञान/प्रकाश. जीवाला ज्या अज्ञानाने ग्रासले आहे, त्या अज्ञानाचा निरास करून ज्ञानाचा प्रकाश जो दाखवितो, तो गुरू..! (गुरु गीता)
निर्गुण, निराकार परमेश्वराचा सगुण, साकार आविष्कार म्हणजेच सद्गुरु पण माणसाला अज्ञानाच्या आवरणामुळे हे कळत नाही.
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा
आज आत्मज्ञानाचे अनुभवामृत देणारे गुरु दुर्मिळ झाले आहेत आणि समजा असले तरी इथे आत्मज्ञान हवय कोणाला.? आज गुरू पौर्णिमेला पेढे, नारळ, कपडे, दक्षिणा मागणारेच गुरु जास्त दिसतात म्हणून मग शिष्यही अशा गुरूंना कंटाळतात.
एका गावात एक मारूतीच मंदिर होतं. तिथं चातुर्मासाच्या निमित्ताने प्रवचन चालू होती. त्याच गावात एक अतिशय गरीब माणूस राहत होता. एकदिवस तो मंदिरात प्रवचन ऐकण्यासाठी गेला. त्यादिवशी प्रवचनकारानी ओघवत्या वाणीने गुरुचे महत्त्व वर्णन केलं. ते प्रवचन ऐकून या माणसाला गुरुमंत्र घेण्याची इच्छा झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या प्रवचनकाराला घरी बोलवलं, त्याचा गुरुमंत्र घेतला, पाद्यपूजा केली, पेढे, नारळ, कपडे, दक्षिणा दिली. आता या शिष्याने सुग्रास भोजन तयार केलं होतं. गुरूंना भोजनाची विनंती केली. त्या प्रवचनकाराला बासुंदी प्रचंड आवडायची. या शिष्याने त्या दिवशी नेमकी आटीव दुधाची बासुंदी केली होती. बासुंदी इतकी उत्कृष्ट झाली होती की, या गुरुंनी एकट्यानेच २/३ लिटरची बासुंदी स्वाहा केली. आता दर तीन-चार दिवसांनी गुरूंनी शिष्याला बासुंदी पुरीचे जेवण बनवायला सांगावं आणि यथेच्च ताव मारावा. शिष्याने महिना-दोन महिने गुरूंना बासुंदी पुरीचे जेवण घातले आणि नंतर मात्र तो वैतागला. नित्याप्रमाणे एक दिवस हे त्याचे गुरु त्याच्या घरी आले. त्याने त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हणाला महाराज आपण बसा, मी बासुंदीसाठी दूध घेऊन येतो. बैठकीत आला आणि विचार करू लागला की, आज तर दूध आणायला देखील पैसे नाहीत. काय करावं बरं..? तेवढ्यात त्याला त्याच्या गुरूंच्या कोपऱ्यात सोडलेल्या चांदीच्या खडावा दिसल्या. त्याने त्या खडावा उचलल्या, सोनाराच्या दुकानात नेऊन विकल्या आणि दहा लिटर दूध आणले. काजू, बदाम, पिस्ते, अाक्रोड, चारोळी हे सगळे जिन्नस आणले आणि अत्युत्कृष्ट बासुंदी तयार केली. गुरुदेव आवडीने बासुंदी खाऊ लागले. शिष्या अप्रतिम..! आज तर बासुंदी न भूतो न भविष्यती इतकी उत्कृष्ट झालीये. एवढी सुंदर कशी काय केलीस रे..? तेव्हा हा शिष्य म्हणाला, गुरुदेव माझं पामराच यात कसलं आलंय मोठेपण.? हा तर आपल्याच पायाचा प्रसाद..!
आता सांगा.. असा गुरु आणि असा शिष्य असेल तर आत्मज्ञान होईल का..? गुरुचे पाय धरा, आधी धरा पण ते सद्गुरु कसे हवेत.? तर ज्ञानराज माऊली म्हणतात -
म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेणे कृत कार्य होईजे
जैसे मूळ सिंचने सहज, शाखा पल्लव संतोषती
असेच गुरु जीवाला भवचक्रातून मुक्त करतात आणि आत्मज्ञानाची म्हणजेच भगवंताची प्राप्ती करून देतात..!
जय जय रघुवीर समर्थ
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )