‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांना शुभ-लाभ, मंगळाची मंगलमय कृपा; पैसा कमी पडत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:19 AM2023-07-06T07:19:25+5:302023-07-06T07:20:02+5:30
Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती कोणत्या क्षेत्रात उत्तम यश मिळवू शकतात? या व्यक्तींना सासरच्या मंडळींकडून चांगला फायदा होतो, असे सांगितले जाते. जाणून घ्या...
Numerology: आपल्याकडे अगदी प्राचीन परंपरा, संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याच्या सिंह राशीत विराजमान झाला आहे. मंगळ ग्रह एका राशीत साधारण ४५ दिवस विराजमान असतो, अशी मान्यता आहे. मंगळ धैर्य, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, नेतृत्व, भावंड यांसह अनेक गोष्टींचा कारक मानला गेला आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ९ आहे. मंगळ हा मूलांक ९ चा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार हे लोक ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.
शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम
मूलांक ९ असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय आणि तत्त्वांवर ठाम असतात. त्यांचे जीवन काहीसे संघर्षमय असते. पण या लोकांमध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची ताकद असते. लोक कलात्मक स्वभावाचे असतात. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतात. त्यांना कला आणि विज्ञानात जास्त रस असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र, ते खंबीरपणे सामोरे जातात. वैवाहिक जीवन संमिश्र स्वरुपाचे असते.
पद, पैसा, प्रतिष्ठा कमावतात
मूलांक ९ असलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते खूप पैसे खर्च करतात. पण रिअल इस्टेटच्या बाबतीत या व्यक्ती भाग्यवान ठरतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना पैसे मिळतात. हे लोक धोका पत्करून पैसे कमवतात. एकूणच त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. मूलांक ९ असलेल्या लोकांना सामान्यतः अभियंता, डॉक्टर, राजकारण, पर्यटन किंवा वीज संबंधित कामात यश मिळते, असे म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.