वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी 'ही' चित्रे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:00 AM2022-03-29T08:00:00+5:302022-03-29T08:00:01+5:30
आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. यासाठी दिलेल्या चित्रांचा वापर करा!
वास्तू शास्त्रात वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते. ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतो. यात वास्तूतुन निघणाऱ्या उर्जेचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात. त्यासाठी वास्तू टिप्स उपयोगी पडतात.
>>अनेक लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात. परंतु या चित्रांमध्येही योग्य निवड केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. जसे की धावत्या घोड्यांचे छायाचित्र!
>>घोडा सळसळता उत्साह, चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. घोड्याचे छायाचित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते.
>>छायाचित्रात घोड्यांची संख्या सात असेल तर ती अधिक लाभदायी मानली जाते. सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला सात घोडे असतात, इंद्र धनुष्यात सात रंग असतात, लग्नात सात फेरे घेतले जातात, नवरा बायकोचे नाते सात जन्माचे मानले जाते यावरून सात या अंकाचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणून सात घोड्यांचे छायाचित्र सर्वोत्तम मानले जाते. केवळ घोड्यांचे छायाचित्र लावायचे नसेल, तर सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्य देवांची प्रतिमा लावावी. ती देखील नक्कीच लाभदायक ठरेल.
>>घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मानली जाते. धावत्या घोड्यांचे छायाचित्र पूर्व दिशेला लावल्यास धनवृद्धीस चालना मिळते.
>>एका घोड्याचे छायाचित्र न लावता घोड्यांच्या समूहाचे छायाचित्र लावावे आणि तेही धावत्या घोड्यांचेच लावावे.
>>आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. म्हणून धावत्या घोड्यांचे छायाचित्र आपल्याला नेहमी उत्साह, जोश आणि ऊर्जा देत राहील, त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग वाढेल आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल.